आरोपीसह चोरलेली कार, मोटारसायकल असा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

उदगीर शहरातील कार चोरी प्रकरणाचा तपास करत असताना सदरील कार नावंदी येथील युवकाने चोरलेली माहिती मिळाली. कार चोरीसोबत एक दुचाकी चोरीची घटनाही उघडकीस आली आहे. चोरलेल्या कार व एक मोटारसायकलसह 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची स्विफ्ट डिझायर गाडी अज्ञात चोरट्याने उदगीर ते बिदर जाणाऱ्या रोडवरून चोरून नेली आहे. या तक्रारीवरून पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक निखित पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात डॅनियल बेन, उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस स्टेशन स्तरावर निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांचे नेतृत्वात गुन्ह्यातील अरोपीच्या शोधकामी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात केले. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना उदगीर ते बिदर जाणाऱ्या रोडवरून चोरीस गेलेली स्विफ्ट डिजायर गाडी नावंदी गावात राहणाऱ्या एका इसमाने चोरल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून माहितीची शहानिशा करून पथकाने एका इसमास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव आकाश उर्फ लखन दयानंद माने (27) रा. नावंदी ता. उदगीर जि. लातूर असे सांगितले.

नमूद स्विफ्ट डिझायर वाहन त्याने उदगीर ते बिदर जाणारे रोडवरून चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर अन्य गुन्ह्यांबाबत विचारणा केली असता त्याने उदगीर ग्रामीण येथेच दाखल असलेल्या एका मोटरसायकल चोरी मधील मोटरसायकल सुद्धा चोरी केल्याचे कबूल केले. त्यावरून आरोपीने गुन्ह्यात चोरलेल्या स्विफ्ट डिझायर व पॅशन प्रो. मोटरसायकल असा 4 लाख 50 हजार रुपयाच्या मुद्देमालासह राहत्या गावातून 3 ऑगस्ट रोजी उदगीर ग्रामीण येथे आणून आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासाठी पोलीस अंमलदार राम बनसोडे, राहुल नागरगोजे, तुळशीराम बरुरे, राहुल गायकवाड, सचिन नाडागुडे यांनी परिश्रम घेतले.