लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या बरे होण्याचा दर 55.5 टक्के

683
corona-new

लातूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर बरसणे सुरू झालेले आहे. लातूर जिल्हा आता हॉटस्पॉट होत आहे. तब्बल 23११ रुग्ण जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. कोरोनाच्या रुग्णांचा बरे होण्याचा दर हा 55.5 टक्के झालेला आहे. त्याप्रमाणे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूनेही शंभरी गाठलेली आहे. 1284 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परलेले आहेत. लातूर जिल्ह्यातील कोरानामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 100 वर पोहोचलेली असून जिल्ह्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा सर्वाधिक 4.3 टक्के आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये जुलै 2020 हा महिना खऱ्या अर्थाने कोरोनाच्या उद्रेकाचा महिना ठरला आहे. लातूर जिल्ह्यात 4 एप्रील रोजी सर्वप्रथम 8 पॉझिटीव्ह रुग्ण निलंगा येथे आढळून आले होते. त्यानंतर एप्रील महिण्यात केवळ 16 रुग्णसंख्या झालेली होती. मे महिण्यात पुन्हा कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढण्यास सुरु झाली परंतू संपूर्ण महिण्यात ही संख्या केवळ 120 होती. कडकडीत संचारबंदीचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही कमीच होती. प्रवास करुन आलेल्या नागरीकांमुळेच जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या नंतर दिवसेंदिवस वाढत चालेली होती. जून 2020 मध्ये जिल्ह्यात कोरोनाचे 218 रुग्ण वाढलेले होते.

जुलै महिण्यात संचारबंदी शिथील झाली, अनेक अस्थापना सुरु झाल्या आणि पर्यायाने कोरोनाचे संकटही अधिक वाढत गेले. जुलै महिण्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रग्णांची संख्या ही तब्बल 2311 वर पोहंचलेली होती. त्यामध्ये केवळ जुलै महिण्यात वाढलेल्या रुग्णांची संख्याच सुमारे 1888 अशी राहिलेली आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये एप्रिल महिण्यात कोरोनामुळे केवळ एका रुग्णाचा मृत्यू झालेला होता. जून महिन्यात 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर जून महिण्यात 15 रुग्णांचा मृत्यू झाला. जुलै महिन्यात कोरोनाचा कहर लातूरकरांनी अनुभवला. एकीकडे रुग्ण संख्याही वाढत होतीच परंतू मृत्यूचे प्रमाणही दररोज वाढत होते. जुलै महिण्यात तब्बल 82 रुग्णांचे मृत्यू कोरोनामुळे झालेले होते. लातूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात उपचारासाठी गेलेल्या आणि मृत्यू पावलेल्या रुग्णांची तर अद्यापही प्रशासनाने नोंदही घेतलेली नाही. काही जण उपचारासाठी पुणे, संभाजीनगर, सोलापूर, हैद्राबाद, नांदेड अशा ठिकाणी गेलेले होते. त्यामुळे सध्या 100 रुग्णांचे मृत्यू अधिकृत दिसत असले तरी त्यामध्ये इतर जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या गृहित धरलेली नाही. त्यामुळे मृतांचा आकडा हा अजूनही निश्चीतपणे वाढणारच आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा दर हा 2.1 टक्के आहे तर महाराष्ट्राचा दर हा 3.5 टक्के असून लातूर जिल्ह्याचा दर मात्र तब्बल 4.3 टक्के आहे.

लातूर जिल्ह्यात आजही 1380 व्यक्ती घरात विलगीकरणामध्ये आहेत तर संस्थात्मक विलगीकरणामध्ये असणाऱ्या नागरिकांची संख्या ही 851 आहे. जिल्ह्यातील 14858 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली त्यामध्ये 1993 जण कोरोनाबाधित आढळून आले तर 2205 जणांची रॅपिड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये 318 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. लातूर जिल्ह्यात सध्या गंभीर अवस्थेतील 16 रुग्ण आहेत तर ऑक्सीजनवर मध्यम स्वरुपातील रुग्णांची संख्या ही 25 असून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ही 886 एवढी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या