शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे, दिलासा मिळेल अशी मदत देणार – विजय वडेट्टीवार

लातूर जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. तरी शेतकऱ्यांनी धीर धरावा, राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या काळात झालेल्या नुकसानीची दिलासादायक मदत मिळेल, अशी ग्वाही मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. निलंगा येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीच्या अनुषंगाने आढावा बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार बोलत होते.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, या आपत्तीच्या काळात सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून शासनाकडून त्यांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाणारच आहे. तसेच राज्य शासनाने तीन दिवसापूर्वी केंद्र शासनाला राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष पाठवण्याची व एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी केलेली आहे असे त्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात खरिपाचे 6 लाख 65 हजार हेक्टर क्षेत्र असून सप्टेंबर मध्ये पहिल्या आठवड्यात झालेला सततचा पाऊस व मागील तीन-चार दिवसातील अतिवृष्टी यामुळे जवळपास दोन लाख हेक्टार क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतीपिकांचे अत्यंत सूक्ष्मपणे पंचनामे पुढील तीन दिवसात करून शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.

नळगीर तालुका उदगीर, जळकोट या भागातील शेती पिकाची पाहणी मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी केली तर निलंगा तालुक्यातील सोनखेड या गावातील पीक नुकसानीची पाहणी करून येथे उपस्थित शेतकऱ्यांना धीर दिला व शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी आमदार धीरज देशमुख निलंगा विधानसभेचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे ही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या