लातूर जिल्हयातील 6 आरोग्य संस्थेत 1 हजार 73 आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड १९ लसीकरणाची सुरुवात करण्याबाबत कळविण्यात आले होते. याकरिता लातूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी एकूण १७३९४ लाभार्थ्यांची (हेल्थ केअर वर्कर्स) माहिती केंद्र शासनाचे पोर्टल वर भरण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांच्या संख्येनुसार जिल्ह्यात लसीकरणाची योग्य ती तयारी करण्यात आलेली असून १६ जानेवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर, MIMSR वैद्यकीय महाविद्यालय लातूर, सामान्य रुग्णालय उदगीर, ग्रामीण रुग्णालय औसा, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर, ग्रामीण रुग्णालय मुरुड या ६ ठिकाणी लसीकरण सुरु करण्यात आले असून प्रत्येक संस्थेस प्रती सत्र १०० लाभार्थ्यांचे (हेल्थ केअर वर्कर्स) Target देण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या दिवशी एकूण ६०० लाभार्थ्यांपैकी ३७९ लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण करण्यात आला. याकरिता जिल्ह्यात Serum Institute of India Pvt. Ltd. या कंपनीची COVISHIELD ही लस वापरण्यात येत आहे.

१६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरण सत्र पार पाडल्यानंतर दोन दिवस प्रतीक्षा कालावधीनंतर जिल्ह्यात वरील ६ संस्थांमध्ये दि १९, २०, २२ व २३ जानेवारी २०२१ रोजी प्रत्येकी १ सत्र आयोजित करण्यात आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोविड लसीकरणास वेग आला असून सर्व हेल्थ केअर वर्कर्स यामध्ये सहभाग नोंदवून लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचे काम उद्दिष्टानुसार पूर्ण करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

संपूर्ण लसीकरण मोहीम योग्य रीतीने पार पडावी तसेच जिल्ह्यातील सर्व हेल्थ केअर वर्कर्स (शासकीय व खाजगी संस्थेतील) यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण व्हावे याकरिता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं), जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी तसेच जिल्हास्तरीय नोडल अधिकारी कर्मचारी वरील आरोग्य संस्थांना भेटी देऊन  मार्गदर्शन करत आहेत.

१६, १९ व २० जानेवारी २०२१ अखेर संस्थानिहाय लसीकरण करण्यात आलेल्या एकूण लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. आरोग्य संस्थेचे नाव, दि १६, १९ व २० जानेवारी २०२१ या कालावधीत लसीकरण करण्यात आलेल्या एकूण लाभार्थ्यांची संख्या, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर, १६८, MIMSR वैद्यकीय महाविद्यालय लातूर- १६४, सामान्य रुग्णालय उदगीर-223, ग्रामीण रुग्णालय औसा- १५९, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर- १८७, ग्रामीण रुग्णालय मुरुड- १७२ एकूण- १०७३ आहे असे जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. एल. एस.देशमुख यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या