मांजरा धरणातील पाणी संपत आले, लातूरकरांवर पाणी कपातीचे संकट

1210

बीड जिल्ह्यातील धनेगाव येथील मांजरा धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. केवळ मृतसाठ्यातील पाणीसाठ्यावर तग धरलेल्या या धरणातील पाणी संपत जात असल्याने लातूर शहरातील पाणी पुरवठ्याची व्यवस्थाही आता अखेरच्या घटका मोजत आहे. ऑक्टोबरपासून फक्त महिन्यातून दोन वेळा पाणी पुरवठा केला जाणार आहे.

बीड जिल्ह्यातील मांजरा धरणातून लातूर शहरास पाणी पुरवठा केला जातो. सध्या या धरणामध्ये मृतसाठ्यातील केवळ ६ दशलक्ष घनमीटर एवढेच पाणी उपलब्ध आहे. आगामी भीषण दुष्काळाची स्थिती लक्षात घेऊन आता लातूर शहरातील पाणी पुरवठ्यात मोठी कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. सप्टेंबरपासून फक्त महिन्यातून दोनवेळा शहरास पाणी पुरवठा केला जाणार आहे. जिल्हा प्रशासन पाणी पुरवठ्याच्या नियोजनास लागलेले आहे. लातूर शहर महानगर पालिकेच्याच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांनही पाणी कपात करावी असे आदेशच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिलेले आहेत.

लातूर जिल्ह्यातील पाण्याची टंचाई सध्या तीव्र स्वरुप धारण करीत आहे. लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 35 टक्के पाऊस झालेला आहे. आज रोजी जिल्ह्यातील 71 गावांमध्ये 72 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 797 विंधन विहिरी व विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या