अबब! लातुरातील तरुणीच्या पोटात निघाला तब्बल 12 किलोचा मांसाचा गोळा

एका 22 वर्षीय तरुणीच्या पोटात तब्बल 12 किलोचा मांसाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. पोटामधील अंडाशयात हा मांसाचा गोळा (ओव्हेरियन ट्युमर) वाढला होता. ही गुंतागुंतीची व अतिशय अवघड शस्त्रक्रिया एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कांती केंद्रे-सिरसाट आणि त्यांच्या चमुने केली.

संबंधित तरुणीला गेल्या अनेक वर्षापासून पोटदुखीचा त्रास होत होता. या तरुणीची यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट यांनी प्राथमिक तपासणी केली असता तिच्या पोटात मांसाचा गोळा (ओव्हेरियन ट्युमर) असल्याचे निदर्शनास आले. यामुळे तरुणीला रुग्णालयात दाखल करुन तिच्या पोटाची सोनोग्राफी, सिटीस्कॅनसह अवश्यक तपासण्या केल्या असता अंडाशयात मासाची मोठी गाठ असल्याचे निदान झाले. अशा स्वरुपातील गाठ अधिक काळ पोटात राहाणे धोक्याचे असल्याने नातेवाईकांना आजाराबद्दल माहिती देवून डॉक्टरांनी सदरील तरुणीच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट यांनी सव्वा तास शास्त्रक्रिया करुन तिच्या पोटातील अंडाशयातील बारा किलोचा मांसाचा गोळा यशस्वीपणे बाहेर काढला. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. आरती माने, डॉ. प्रिती कांबळे यांनी सहाय्य केले. तर भूल तज्ज्ञ म्हणून डॉ. टी. के. कारंडे यांनी सेवा बजावली.

काही दिवसांच्या उपचारानंतर नुकतीच या तरुणीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या तिची प्रकृती चांगली असून शस्त्रक्रियेपूर्वी होत असलेला त्रासही कमी झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या