लातूरात पाण्यावरून राडा, दोन गटात तलवार, कोयते घेऊन हाणामारी

2222

लातूर शहरातील नांदेड रोड भागातील एसओएस बालग्राम जवळील सार्वजनिक पाण्याच्या बोअरवरुन झालेल्या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन गटात झालेल्या याा मारामारीत तलवार, काठीने मारहाण करण्यात आली असून दोन्ही गटातील १४ जणांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अश्रुबा उर्फ सागर परमेश्वर लोंढे याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, सार्वजनिक पाण्याचा बोर बंद पडल्यामुळे फिर्यादी व त्याच्या मित्राने पुढाकार घेऊन महानगर पालिकेस अर्ज देऊन चालू करुन घेतलेला होता. पुन्हा तो बोअर २५ मे रोजी बंद पडला. २६ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बोअर दुरुस्ती करत असताना फिर्यादीने तेथील लोकांना पाणी जपून वापरत नाहीत म्हणून शिवीगाळ केली होती. त्या ठिकाणी किराण दुकानाजवळ थांबलेला अजय पाटोळे याने बोअर आम्ही जाळला आहे, तू बोअरची चावी माझ्याकडे दे म्हटल्याने फिर्यादीने त्याला चापट मारली. त्यानंतर पाटोळे तेथून निघून गेला.

पुन्हा रात्री ९.३० वाजता सागर लोंढे बोअरजवळ थांबलेला असताना संतोष शेखर पाटोळे, अजय शेखर पाटोळे, राजेश लोंढे, सुभाष लोंढे, सुनील लोंढे, अंजनाबाई लोंढे, छायाबाई शेखर पाटोळे, महेश पाटोळे, राहूल घोडके यांनी फिर्यादी बसलेल्या कारला घेरुन त्यांच्या अंगावर मिरचीची पावडर टाकली. संतोष पाटोळे याने कारचा दरवाजा काढून शिवीगाळ करुन तलवारीने फिर्यादीच्या उजव्या हातावर वार करुन जखमी केले. अजय पाटोळे याने कोयत्याने उजव्या पायाच्या मांडीवर वार केला. फिर्यादी सोबतचे दिनेश सुर्यवंशी, अतूल सुर्यवंशी, रवी सुर्यवंशी विक्रम देडे, यांनाही काठीने, तलवारीने, कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी आणखी एका व्यक्तीने तक्रार नोंदवली आहे. सुभाष लोंढे याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, सार्वजनिक बोअरच्या कारणावरुन अश्रुबा लोंढे, दिनेश बालाजी सुर्यवंशी, अतुल सुर्यवंशी, रवी सुर्यवंशी, विक्रम देडे यांनी कुरापत काढून अजय शेखर पाटोळे, संतोष शेखर पाटोळे, राजेश लोंढे, सुनिल लोंढे यांच्यासोब शिवीगाळ करुन काठ्याने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्यालाही शिवीगाळ करुन मारहाण केली. त्याच्या अंगावर गाडी घातली त्यामध्ये फिर्यादीच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड मोडले. जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ५ जणांविरुध्द विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या