मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उजेड (हिसामाबाद) मंडळ येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे .यासंदर्भात कृषी विभागाला व महसुल विभागाला लेखी तक्रार देऊन सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. यामुळे हिसामाबाद महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तूर, मूग, उडीद या पिकांचे तसेच भाजीपाला व मोठ्या प्रमाणात हाती आलेले सोयाबीन पिकांचे नुकसान झालेले असून या मागण्याकडे प्रशासनाचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उजेड येथील शेतकऱ्यांनी आज निलंगा घरणी रोडवर एक तास रस्ता रोको आंदोलन केले .
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेऊन ताबडतोब शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी बांधवांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल अशा इशारा उजेड येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाद्वारे प्रशासनास दिलेला आहे. यासंदर्भात आबासाहेब पाटील उजेडकर शेतकरी यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांचे शिरूर अनंत पाळ तहसीलदार यांना नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब मदत द्यावी यासाठी रीतसर निवेदन दिलेले आहे.
अद्याप पर्यंत महसूल व कृषी विभागाचा कुठलाही अधिकारी पंचनामेसाठी शेतकऱ्याच्या बांधावर आलेला नाही. त्यामुळे रास्ता रोकोचा, आंदोलनाचा पर्याय निवडावा लागला. प्रशासनाने याची दखल घेऊन सरसकट पंचनामे शेतकऱ्याच्या नुकसानीचे करावेत अन्यथा शेतकऱ्याच्या रोशाला प्रशासनास व शासनास सामोरे जावे लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दैनिक सामनाशी बोलताना दिली.