राज्यपाल कोश्यारी चले जाव! महाराष्ट्रात आंदोलन जोर धरू लागले

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या सहा दिवसांपासून कोश्यारी यांच्याविरुद्ध राज्यात सुरू असलेले आंदोलन तीव्र झाले असून शुक्रवारी लातूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला तर सांगलीमध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले. ‘राज्यपाल कोश्यारी चले जाव’, ‘कोश्यारींना हटवा, दिल्लीला पाठवा’ अशा घोषणा देत यावेळी शिवप्रेमी जनतेने आपला संताप व्यक्त केला. शिवरायांचा अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असा इशाराच यावेळी देण्यात आला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ सकल शिवप्रेमींनी शुक्रवारी पुकारलेल्या लातूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा- महाविद्यालये, दुकाने, आस्थापना बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला.

सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळय़ास अभिवादन करून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले. कोश्यारी यांच्या निषेधाचे फलक घेऊन शिवप्रेमी रॅलीत सहभागी झाले होते.