लवाटे दांपत्याला जगण्याची ऊर्मी, मरणाची इच्छा मेली

117

सामना ऑनलाईन, मुंबई

इच्छामरण कायदा व्हावा यासाठी तब्बल ३० वर्षे लढा देणाऱया गिरगावच्या वयोवृद्ध लवाटे दांपत्याची आता मरणाची इच्छा मेली असून त्यांना जगण्याची इच्छा वाटू लागली आहे. इच्छामरणाचा विषय चर्चेत आणण्यात आपला थोडाफार हातभार लागला याचा आनंद मानून लवाटे आजी-आजोबांनी या विषयाला पूर्णविराम दिला आहे.

गिरगावच्या झावबावाडीतील इरावती लवाटे (७८) आणि नारायण लवाटे (८७) हे जोडपे त्यांच्या मरणाच्या इच्छेने गेली अनेक वर्षेत चर्चेत आहे. आयुष्यभर एकमेकांना साथ दिल्यानंतर आता मृत्यू येणार हे अटळ आहे. परंतु त्याची वाट न बघता तो एकत्र यावा, धडधाकट असताना यावा आणि अवयवदान करता यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे दोघांनी गेल्या काही वर्षांपासून इच्छामरणाची मागणी लावून धरली. सातत्याने सरकारदरबारी पाठपुरावा केला. राष्ट्रपतींसह अनेकांना पत्रे लिहिली. अलीकडच्या काळात इच्छामरणाच्या मागणीवर त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून ३१ मार्च २०१८ उत्तराची अपेक्षा व्यक्त केली होती. या पत्रात त्यांनी इच्छामरणासाठी परवानगी द्या, अन्यथा आत्महत्या करू अशा इशारा दिला होता. या पत्रावर राष्ट्रपतींकडून कोणतेही उत्तर आले नसल्याचे इरावती लवाटे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.

गेल्याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासीक निकाल देत इच्छामरणाला सशर्त परवानगी दिली. या निर्णयावर समाधानी नसल्याची प्रतिक्रिया लवाटे दांपत्याने दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली सशर्त परवानगी ही अंथरुणाला खिळून असलेल्या व्हेंटिलेटरवर असलेल्या आजारी व्यक्तीसाठी आहे, परंतु धडधाकट असूनही इच्छामरण हवे असलेल्या लोकांवर हा एकप्रकारे अन्याय असल्याचे दांपत्याने म्हटले होते.

आतापर्यंत इच्छामरणावर बरीच सांगोपांग चर्चा झाली. या विषयाला चर्चेत आणण्यात ईश्वरी इच्छेमुळे आमचा थोडाफार हातभार लागला आहे. याचा आम्हाला आनंद आहे. लहानांपासून मोठय़ांसोबत केलेल्या चर्चेमुळे आणि प्रभू रामचंद्र व गजानन महाराज यांच्यावरील नितांत श्रद्धेमुळे आमच्या विचारात बदल घडला आहे. त्यामुळे आम्ही उभयता  इच्छामरण या विषयावरील चर्चेला पूर्णविराम देत आहोत असे लवाटे दांपत्याने सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या