कायदेमंत्र्यांनी लक्ष्मणरेषा ओलांडलीय! किरेन रिजीजू यांच्या विधानावर हरीश साळवेंची नाराजी

ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी एका कार्यक्रमात केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरण रिजिजू यांनी केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. रिजिजू यांनी न्यायव्यवस्था आणि सरकारमधील तणावावर टीपण्णी करून लक्ष्मणरेषा ओलांडली असल्याचं साळवे यांनी म्हटले आहे.

सोमवारी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय विधी व न्यायमंत्री रिजिजू यांनी न्यायमूर्तींची निवड करणाऱ्या कॉलेजियम पद्धतीवर टीका केली होती. ‘सरकारकडे फाईल प्रलंबित आहे, असे म्हणू नका. सरकारकडे फाईल पाठवूच नका. तुम्ही स्वतःच स्वतःची नेमणूक करा’, असा टोला रिजिजू यांनी लगावला होता. कॉलेजियम पद्धतीमध्ये त्रुटी असून ही व्यवस्था पारदर्शक नसल्याचे लोक म्हणत आहेत. त्यामुळे सरकार पावले उचलत आहे, असे रिजिजू यांनी म्हटले होते.

हरीश साळवे यांनी केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्या विधानाबाबत बोलताना म्हटले की, “माझ्या मते विधी व न्यायमंत्र्यांनी हे विधान करून लक्ष्मणरेषा ओलांडली आहे. एखादा धडधडीत असंविधानिक कायदा पाहून आपले हात आखडते घ्यावे आणि कायद्यातील सुधारणेसाठी सरकारच्या दयेवर अवलंबून राहात त्यांच्या अधीन राहावे असे मंत्र्यांना वाटत असेल तर माफ करा, मात्र त्यांची ही चुकीची धारणा आहे.”

न्यायमूर्ती कौल काय म्हणाले?

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीयमंत्री रिजिजू यांनी केलेल्या टीकेची दखल घेतली आहे. सोमवारी सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एस. के. कौल यांनी रिजिजू यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली, असे व्हायला नको होतं, असे न्या. कौल म्हणाले. मिडियात आलेल्या वृत्तावर जावू नका, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर न्या. कौल म्हणाले, अॅटर्नी जनरल आणि सॉलिसिटर जनरल या दोघांनीही विधी अधिकाऱ्याची भूमिका पार पाडावी, अशी माझी अपेक्षा आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या कायद्याचे पालन केले जाईल याची खात्री करण्यासाठी सरकारला त्यांनी सल्ला द्यावा. ती मुलाखत होती आणि मुलाखतीत बोललेले वक्तव्ये फेटाळणे कठीण असते, असेही न्या. कौल यांनी सांगितले.