
कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने खंडणी उकळण्याचा कट रचला होता आणि त्यासाठी त्यांनी यादी बनविली होती त्यात सिने निर्माता करण जोहर यांचाही समावेश होता, असे या गँगचा सदस्य सिद्धेश कांबळे ऊर्फ महांकाळ यांच्या चौकशीतून समोर आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. दरम्यान याबाबत सत्यता पडताळण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते.
सिद्धेश कांबळे हा सध्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहे. मुंबई गुन्हे शाखा, पंजाब पोलीस आणि दिल्ली स्पेशल टिमच्या पथकाने पंजाबी गायक सिद्धे मुसेवाला हत्या आणि बॉलीवूड स्टार सलमान खान व त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाल्याप्रकरणाची सिद्धेशकडे चौकशी केली आहे. दरम्यान, मुसेवाला हत्याप्रकरणातील शूटर संतोष जाधव याचा सिद्धेश हा खास पंटर आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. लॉरेन्स बिश्नोई गँगने काही नामांकित व्यक्तींकडून खंडणी उकळण्याचा कट रचला होता आणि त्यात करण जोहर हा देखील टार्गेटवर होता, असे सिद्धेश सांगत असल्याचे समजते. मात्र त्याचे बोलणे कितपत खरे आहे याची खातरजमा केली जात असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.