‘छपाक’ पुन्हा वादात, प्रदर्शन रोखण्यासाठी भट्ट यांची कोर्टात धाव

1420
chhapaak

अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या मुलीची कथा सांगणारा व मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आगामी चित्रपट ‘छपाक’ विरोधात नवी याचिका दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ‘छपाक’च्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

महिला वकील अपर्णा भट्ट यांनी ‘छपाक’चे प्रदर्शन थांबण्यासाठी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करताना त्यांनी आपल्याविरोधात अन्याय झाल्याचे यात म्हटले आहे. अपर्ण भट्ट यांच्या म्हणण्यानुसार अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मीच्या त्या वकील होत्या. लक्ष्मीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी अनेक वर्ष लढा दिला. मात्र असे असताना देखील चित्रपटात त्यांना क्रेडिट देण्यात आलेले नाही. भट्ट यांच्या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या आधी ‘छपाक’ चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप करत लेखक राकेश भारती यांनी अॅड. अशोक सरोगी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच दीपिका पदुकोण ही चित्रपट प्रदर्शना दरम्यान ‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांच्या बाजूने आंदोलक विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर भाजप समर्थकांनी तिच्याविरोधात आवाज उठवला. तसेच देशभक्त असाल तर छपाक पाहायला जाऊ नका, अशा प्रकाराचा ट्रेंड देखील सोशल मीडियावर गेले दोन दिवस सुरू आहे. त्यामुळे छपाकसमोरच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाही हे स्पष्ट आहे.

अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या मुलीची कथा सांगणारा छपाक हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. त्यामुळे कोणीही कथा चोरल्याचा आरोप करू शकत नाही. निर्मात्यांची बदनामी करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठीच अशा प्रकारची निरर्थक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्याचा दावा चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या