वकीलांचे चक्का जाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा

strike-01
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । सटाणा

शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच राहील, सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सटाणा वकील असोसिएशनने येथील राष्ट्रीय महामार्गावर आज तब्बल ३ तासांहून अधिक वेळ चक्काजाम आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.

येथील बस स्थानकासमोरील राष्ट्रीय महामार्गावर सटाणा वकील संघ असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. पंडितराव भदाणे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी व वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर वकील संघ व शेतकरी वर्गाने चक्का जाम आंदोलनास प्रारंभ केला. परिणामी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. त्यातच एस. टी. बसेस सुरू झाल्याने प्रवासासाठी बाहेर पडलेल्या चाकरमानी व प्रवाशांना या चक्का जाम आंदोलनाचा देखील मोठा फटका बसला.

यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पंडितराव भदाणे भाषणात म्हणालेत की, शासनाने सरसकट कर्जमापी करावी, स्वामिनाथ आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतमालाला रास्त भाव द्यावा, या सारख्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करून केंद्र व राज्य शासनाचा निषेध करीत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष भास्कर सोनवणे, वकील संघाचे अॅड. नाना भामरे, अॅड. वसंतराव सोनवणे, अॅड. रेखा शिंदे यांची भाषणे झाली. बागलाणचे प्रातांधिकारी प्रवीण महाजन, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. आंदोलनात अॅड. हिरामण सोनवणे, अॅड. अभिमन्यू पाटील, अॅड. विष्णू सोनवणे, अॅड. रवींद्र पाटील, अॅड. संजय सोनवणे, अॅड. चंद्रकात अहिरे, अॅड. नरेंद्र टाटिया, अॅड. चंद्रशेखर पवार, अॅड. दत्ता क्षीरसागर, अॅड. संजय शिंदे, अॅड. रेखा शिंदे, अॅड. सुजाता पाठक, अॅड. मनीषा पवार, अॅड. चिंधडे, डोंगर पगार, देवीदास निकम, सुभाष सावकार, आदींसह संपूर्ण तालुक्यातील शेतकरी आंदोलनात सहभागी होते.

आपली प्रतिक्रिया द्या