लक्ष्मीबाई जगन्नाथ गुप्ते

214

<<  टिवल्या – बावल्या >>  शिरीष कणेकर 

मी ढोपराएवढा होतो तेव्हा मला वाटायचं की सगळ्याच लहान मुलांचं त्यांची आजी करते. मग आई ही मधल्या पातळीवरची संस्था मला कळली. मला नवा प्रश्न पडला. आजी करते ते सगळं आईलासुद्धा येतं? शाळेला दांडी मारायची परवानगीसुद्धा आई देऊ शकते? तीसुद्धा अन्न भरवू शकते? तीसुद्धा चॉकलेटच्या वड्या हातावर ठेवू शकते? तीसुद्धा शाळेत न्यायला सोडायला येऊ शकते? तिला पण छान छान गोष्टी सांगता येतात? ती पण रागावून अबोला धरते? कोपर खरचटलं तर तिच्याही डोळयांत पाणी तरळतं? आजारी असतानाही ती धावून धावत सगळं करते? बाबा मारायला आले तर तीही पाठीशी घालते? पावसात भिजलं तर तीही हातावर चिमूटभर ‘क्विनाइन’ची पावडर ठेवते?… आई अगदी आजीसारखी असते? काही मुलांना आई आणि आजी दोघी असतात म्हणे. किती गंमत ना?

‘तुम्हारे संग मैं भी चलूंगी पिया जैसे पतंग पीछे डोर’ हे गाणं जन्माला यायच्या कितीतरी आधी माझी आजी (माँकी माँ!) आजोबांच्या नोकरीच्या निमित्तानं त्यांच्या पाठोपाठ बरहाणपूर येथे गेली. आता एका मुंबईत पश्चिम रेल्वेवरची मुलगी लग्न करून मध्य रेल्वेवर जायला तयार नसते. यंव रे गब्रू. लवकरच बोरिवलीची मुलगी बोरिवलीचं व पार्ल्याची मुलगी पार्ल्याचं स्थळ बघेल. शक्यतो बिल्डिंगमधलं, फार तर गल्लीमधलं स्थळ हवं. घरी भजी तळली तर आईला तो गरम भजीचा झारा लेकीच्या ताटात रिकामा करता आला पाहिजे इतकी ती जवळ हवी. सगळं यांच्या मर्जीनुसार व्हायला हवं. मग लग्न करून त्या उपकारापुरत्या उरतील. यालाच स्त्रीमुक्ती म्हणत असावेत. एकेकाळी पुरुषांचा वरचष्मा, जाच व ‘हम करे सो कायदा’ असेलही पण आता पुरुष मुक्तीचे दिवस आलेत हे कोणी लक्षातच घेत नाही. माझ्या आजीच्या बाबतीत बरहाणपूरला जायचं की नाही हा प्रश्नच आला नव्हता. जिकडे नवरा तिकडे बायको. जहाँ तुम वहाँ हम. ‘तुम्ही जा बरहाणपूरला किंवा आणखी कुठे मसणात. आम्हाला पुण्यात घर घेऊन द्या, या कधीतरी चक्कर मारायला इकडे. बा य’ असं पातिव्रत्य तेव्हा अस्तित्वात नव्हतं.

‘‘तिकडे कुठल्या कुठे मध्य प्रदेशात तू दुःखात होतीस का ग?’’ मी एकदा आजीला विचारलं.

‘‘कसल्या दुःखात?’’ तिनं आश्चर्यानं विचारलं. नवऱयाबरोबर राहावं लागणं हेच दुःख हे तिला व तिच्या पिढीच्या स्त्रीयांना कुठं माहीत होतं? व्यक्तिमत्त्वाचा विकास म्हणजे जोडीदाराला कस्पटासमान लेखणे हे आम्हाला माहीत नव्हते, लग्नच कस्पटाशी केलं तर गोष्ट वेगळी.

मित्रमंडळींनी माझ्या आजोबांची सत्तरी साजरी केली. असा समारंभ होऊ शकतो हे एरवी कोणाच्या गावीही नव्हतं. मित्रांनी आजोबांवर गौरवपर बोलू शकतील अशी नाववाली माणसंही गाठली. आजोबांचा एकूण आविर्भाव असा होता की तुम्हा नतद्रष्टांना माझी किंमत नसली तरी जगाला आहे. सत्कार समारंभानंतर भेट मिळालेलं कोटाचं कापड घेऊन व ते सुवर्ण पदकासारखं मिरवीत आजोबा घरी परतले तेव्हा मीठ घातलेल्या कोकाकोलासारखे फसफसत होते.

‘‘मला बोलायचं होतं.’’ आजोबा आजीला म्हणाले, ‘‘तू मला सारखं खाली का बसवत होतीस?’’

‘‘तसं नाही.’’ आजी शांतपणे म्हणाली, ‘‘ते भाषणं करत होते ती मी कानात प्राण आणून ऐकत होते. म्हटलं गेल्या पंचावन्न वर्षांत मला जे गुण दिसले नाहीत ते आहेत तरी कोणते ते बघावं. का हो माझ्यापासून ते अलौकिक गुण इतकी वर्षे लपवून ठेवलेत?’’

कोकाकोला लवंडला.

माझी आजी विलक्षण हुशार होती. (माझ्यावरून कळतंच म्हणा!) दुसरीत की तिसरीत असताना तिचं लग्न लावून दिलं नसतं तर ती किती शिकली असती सांगता येत नाही. घरात काही गोपनीय बोलायचं असलं तर तिला कळू नये म्हणून इंग्रजीतून बोलत. तिला शब्द न शब्द कळायचा. निर्विकार चेहऱ्यानं ती बसून राहायची. नंतर ती मला सगळं सांगायची.

‘‘तुला कसं ग एवढं इंग्रजी कळतं?’’ मी कौतुकाश्चर्यानं विचारायचो.

‘‘बऱ्याच गोष्टीतलं बरंच कळतं रे, शिरा.’’ ती का कुणास विष्पणपणे म्हणायची. तिच्या डोक्यात काय चाललेलं असायचं मला कधीच कळलं नाही. मला ‘शिरा’ म्हणणारी ती एकटीच.

‘‘तू तुझ्या बायकोचं नाव पुरी ठेव’’ एकदा ती मला अकस्मात म्हणाली.

‘‘हे काय?’’ मी अचंब्यानं  विचारलं.

‘‘अरे, असं काय करतोस? तू शिरा ना? मग तुझी बायको पुरी. संसार शिरा-पुरीच्या जेवणासारखा होईल.’’ ती खळखळून हसत म्हणाली.

बरं झालं ती माझं लग्न व संसार पाहायला नव्हती. तिचं ते खळखळून हसणं मात्र माझ्या कायमचं लक्षात राहिलं. ती सहसा कधी हसायची नाही. हसण्यासाठी प्रयत्न करावे लागत असं तिचं आयुष्य गेलं होतं. दोन तरण्याताठ्या व एक तान्ही मुलगी गेली. एकुलता एक आठ-दहा वर्षांचा मुलगा ‘सी. के. नायडू म्हशीचं पारडू’ म्हणत गावभर उंडारायचा. पटदिशी गेला.

‘‘काय झालं होतं त्याला?’’ मी विचारलं.

आजी-आम्ही तिला मामी म्हणायचो- ओठ डावलून गप्प बसली. तिनं पोटचा पोरगा गमावला होता आणि इथे मी जणू शिळोप्याला हवापाण्याच्या गोष्टी बोलत होतो. इतका कसा मी असंवेदनशील? मात्र त्यानंतर पुन्हा कधीही मी आमच्या बालपणीच गेलेल्या भालूमामाचा विषय मामीसमोर काढला नाही.

ती दिवेलागणीच्या वेळेला वऱ्हाड्यांत अंधारात बसायची. तिच्या डोळ्यांना तो अंधार जणू दिसायचाच नाही. पुतळ्यांसारखी स्तब्ध व निश्चल बसायची. जणू ती या जगातच नसायची. मी काही कारण नसताना तिला दुष्टाव्यानं विचारायचो- ‘‘मामी, रडत्येयस का?’’

ती भडकून उठायची. तिनं आयुष्यात इतके अश्रू पाहिले होते की तिन्हीसांजेच्या वेळेला कोणी त्यांची आठवण काढली तरी तिचा थरकाप व्हायचा. याची कशाचीच जाणीव नसलेला मी तिच्या जखमांवरच्या खपल्या काढण्यातच आनंद मानत होतो. तिचे भोग अजून संपलेले नव्हते. ते माझ्या रूपानं तिच्या आसपास घिरट्या घालत होते. ‘जो घास भरवेल त्याच्या हातालाच चावेल मेला’ असं ती माझ्याविषयी एकेकाळी म्हणायची ते खोटं नव्हतं. मला तरी गृहीत धरून चालायला आणि छळायला दुसरं कोण होतं?

एकदा ती मला अकस्मात म्हणाली, – ‘‘माझी काही थोडी पुण्याई असेल ती मी तुझ्यासाठी सांभाळून ठेवल्येय. तुझ्या एकट्यासाठी. संकटं येतील, दुःख येतील. ती कोणाला चुकलीत? पण एक सांगते. तुझा कधीही कडेलोट होणार नाही. माझे म्हातारीचे शब्द लक्षात ठेव…’’

वेळोवेळी मला तिचे शब्द आठवत राहिले. कडेलोट समोर दिसत होता पण तो टळला. मामीची पुण्याई आजही माझ्या पाठीशी आहे. माझा कडेलोट होणार नाही. मी उन्मळून पडणार नाही.

इतिहास माझी नोंद घेणार नाही. तो मामीचीही दखल घेणार नाही. म्हणून मी अक्षरात तिचं नाव लिहून ठेवतो – लक्ष्मीबाई जगन्नाथ गुप्ते!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या