राहुल गांधींचे रटाळ भाषण, मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेत्यांच्या डुलक्यांवर डुलक्या!

सामना ऑनलाईन । बरगाडी

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये डेरा टाकला आहे. पंजाबमध्ये शेवटच्या टप्प्यात 13 जागांसाठी मतदान होणार आहे. गुरुवारी पंजाबच्या बरगाडी येथे काँग्रेसच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी भाषण केले. त्यांच्या रटाळ भाषणावेळी उपस्थित नागरिक डुलक्या काढत होते. एवढेच नव्हे तर चक्क व्यासपीठावर बसलेले पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, काँग्रेस नेते आमदार दर्शनसिंग बराड आणि लोकसभेचे उमेदवार मोहम्मद सादिक हे तिघेही शांत डुलक्या घेत होते. तिकडे राहुल केंद्रातील मोदी सरकारवर भाषणात जोरदार टीका करीत होते आणि मतदारांसह नेते मंडळी झोप न आवरल्याने डुलक्यांवर डुलक्या घेताना छायाचित्रात दिसून आले आहेत.

‘दै. भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, बरगाडी येथे राहुल गाधी यांनी तब्बल 25 मिनिटं भाषण केले. या लांबलचक भाषणाचा फायदा उपस्थित नागरिकांनी आणि मंचावरील नेत्यांनी झोप काढण्यासाठी घेतला. दुपारच्या वेळी झालेल्या या सभेत नेते लोक सुस्तावलेले दिसले.