जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये “जल” शताब्दी

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

पावसात टपटप गळणारी एस.टी.आपण अनुभवलीय पण इथं तर रेल्वेगाडीच्या छप्परातून पावसाची गळती सुरु आहे. असा अनुभव जनशताब्दी एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अनुभवला. we care बोधवाक्य असलेल्या कोकण रेल्वेने मात्र प्रवाशाच्या यातक्रारीकडे गांभीर्याने पहात मडगावला तात्काळ दुरुस्ती केली.

‘तुला पहाते रे’ या मालिकेतील स्वानंद देसाई हे मुंबई-मडगाव असा जनशताब्दी एक्स्प्रेसने प्रवास करत असताना डि 1 या डब्यात पावसाचे पाणी गळत होते. पावसाचे पाणी प्रवाशांना न्हाऊ घालत होते. जणू जनशताब्दी एक्स्प्रेसची जलशताब्दी एक्सप्रेस होत होती. त्यावेळी स्वानंद देसाईने रेल्वेगाडीत टपटप गळणाऱ्या पावसाचा व्हिडीओ तयार केला आणि तो फेसबुकवर अपलोड केला. हा व्हिडीओ त्याने आवर्जुन कोकण रेल्वेप्रेमी प्रा.उदय बोडस यांना टॅग केला. व्हिडीओ पाहिल्यावर प्रा.उदय बोडस यांनी तो व्हिडीओ कोकण रेल्वे क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंड्ये यांना पाठवला. “we care” या बोधवाक्याला बांधील राहून क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंड्ये यांनी मडगाव कार्यशाळेला कळवले. मडगाव येथील कर्मचारी वर्गाने भर पावसात तात्पुरती उपाय योजना करून गळती रोखली.

आपली प्रतिक्रिया द्या