लांब दाढी, डोक्यावर पगडी.. आमीर खान असा का दिसतोय? वाचा…

798

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अशी ओळख असणारा अभिनेता आमीर खान सध्या बराच काळ बॉलिवूडच्या पडद्यापासून दूर आहे. त्याचा ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ तिकीटबारीवर दणकून आपटल्यानंतर त्याने काही काळ शांत बसणंच पसंत केल्याचं दिसत आहे. पण, प्रसिद्धीपासून दूर असलेला आमीर सध्या एका वेगळ्याच रुपात फिरताना दिसतोय.

लांब दाढी, डोक्यावर शीख पगडी अशा वेशातल्या आमीरचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. कारण, ‘गझनी’पासून सुरू झालेली त्याच्या विविध लूक्सची चर्चा. आपल्या आगामी चित्रपटासाठी केसांपासून ते शरीरयष्टीपर्यंत सगळ्यावर जीवतोड मेहनत करणाऱ्या आमीरचा लूक बदललेला दिसला कीच त्याच्या आगामी चित्रपटाची चर्चा सुरू होते. तसंच काहीसं या फोटोबाबतीतही झालं आहे. या फोटोत दिसणारा आमीरचा लूक त्याच्या आगामी लाल सिंग चढ्ढा या चित्रपटासाठी असल्याचं समजत आहे.

लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झालेल्या फॉरेस्ट गंप या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. राजकारण, प्रेम, इतिहास, खेळ, युद्ध अशा अनेक भावभावनांचे ते मिश्रण असल्यानेच आमीरने ही कथा निवडल्याचं बोललं जात आहे. आमीरसोबत या चित्रपटात अभिनेत्री करीना कपूरही झळकणार आहे. तिचा या चित्रपटातील लूकही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. आमीर आणि करीना यापूर्वी थ्री इडियट्स (2009) आणि तलाश (2012) या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले होते. त्यानंतर आता हा त्यांचा तिसरा चित्रपट येणार आहे. या चित्रपटातील अन्य कलाकार कोण असतील हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे 2020च्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. 

आपली प्रतिक्रिया द्या