बेरुत स्फोटात आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू, 4 हजार जण जखमी

1674

लेबनॉनमधील बेरूत येथील बंदरामध्ये झालेल्या स्फोटामध्ये आतापर्यंत किमान 100 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या स्फोटात 4 हजारपेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे संपूर्ण बेरूत शहर हादरलं होतं. स्फोटानंतर आकाशामध्ये मश्रूमच्या आकाराचे धुराचे लोट उठले होते. लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष मिखाईल आऊन यांनी सांगितले की  इथल्या एका गोदामामध्ये 2750 टन अमोनियम नायट्रेट असुरक्षित पद्धतीने साठवण्यात आलेले होते. हा साठा 6 वर्ष तसाच पडून होता. त्याचाच हा स्फोट झाला होता. या स्फोटानंतर बुधवारी तिथल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली असून बेरूतमध्ये दोन आठवडे आणीबाणी लागू करण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो.

lebanon-injured-man

हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये. लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की तिथल्या जखमींचा आकडा खूप मोठा आहे. संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आलं आहे की त्यांचा एकही कर्मचारी या स्फोटात जखमी झालेला नाहीये. या स्फोटामुळे बेरूत शहरात दूरदूरपर्यंत काचांचा खच पाहायला मिळत होता. स्फोटामुळे इमारतींची काचेची तावदाने चक्काचूर झाली होती. या स्फोटामुळे लेबनॉनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाचेही नुकसान झाल्याचे कळाले आहे.या स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्याचे हादरे 240 किलोमीटर लांबपर्यंत जाणवले होते. सायप्रस बेटावरील लोकांनादेखील हे हादरे जाणवले होते,मात्र त्यांना वाटले की हा भूकंप आहे.

lebanon-blast

संयुक्त राष्ट्राच्या शांतता सैन्याचे एका जहाजाचे या स्फोटात नुकसान झाले आहेत. अनेक सैनिकही स्फोटात जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती ही चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फोर्स कमांडर मेजर जनरल डेल कॉल यांनी आम्ही या कठीण प्रसंगात लेबनॉनच्या लोकांसोबत आणि तिथल्या सरकारसोबत असल्याचं सांगितलं आहे. कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी आम्ही तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

lebanon-blast-injured-peopl

स्फोट कसा झाला याचे कारण शोधून काढण्यासाठी चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. स्फोटासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांना कठोर शासन केले जाईल अशी ग्वाही लेबनॉनच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. लेबनॉनमधली परिस्थिती चिंताजनक बनत चाललेली असतानाच झालेल्या या स्फोटामुळे तिथलं वातावरण आणखीनच चिंताग्रस्त झालं आहे. पहिलेच आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या हा देश कोरोनाशी कसाबसा झुंज देत आहे. शुक्रवारी लेबनॉनचे माजी पंतप्रधान रफिक हरीरी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना काय शिक्षा द्यायची याचा फैसला होणार आहे. त्यामुळे तिथलं वातावरण तणावग्रस्त बनलेलं आहे. अशा परिस्थितीत हा स्फोट झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या