बीकेसीएल, अप्पर वरळीवाल्यांचे कंबरडे मोडणार, फसव्या जाहिराती करणाऱ्या विकासकांविरुद्ध कायदेशीर कारवाई

15

सामना ऑनलाईन, मुंबई

जागेच्या विक्रीसाठी खासगी विकासक मूळ ठिकाणाचे नाव व पिनकोड बदलून ग्राहकांची दिशाभूल करताना दिसतात. वांद्रे कलानगर विभागाचे ‘बीकेसीएल’, जोगेश्वरी विभागाचे ‘अंधेरी’ आणि लोअर परेल विभागाचे ‘अप्पर वरळी’ अशा फसव्या जाहिराती करून विकासकांनी अक्षरशः सर्वसामान्य ग्राहकांची लयलूट केली आहे. फसव्या जाहिराती करणाऱ्या विकासकांचे आता कंबरडे मोडणार असून अशा विकासकांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

खासगी विकासक मुंबई शहरात प्रकल्प राबविताना विकसित जागेच्या विक्रीसाठी जागेच्या नावात आणि पिनकोडमध्ये परस्पर बदल करून जाहिरातींद्वारे ग्राहकांना भुरळ पाडताना दिसतात. प्रत्येक विभागाचा पिनकोड ठरलेला असतानाही फसव्या जाहिरात करून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसतात. खासगी विकासकांच्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पुढाकार घेतला आहे.

यासंदर्भात वायकर यांनी नुकतीच स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे गौतम चटर्जी यांची भेट घेतली आहे. जनतेची दिशाभूल करणाऱ्या अशा विकासकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थावर संपदा (विनियमन व विकास) अधिनियमाअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या नियमामध्ये योग्य तरतूद करण्यात यावी अशी सूचना वायकर यांनी गौतम चॅटर्जी यांना केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या