काँग्रेसच्या फुटलेल्या आठ आमदारांवर कारवाई अटळ, 19 जुलैला होणार मोठा निर्णय

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवणुकीत काँग्रेस पक्षाच्या आठ आमदारांनी स्वपक्षाचे आदेश धुडकावत क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे फुटलेल्या या आठ आमदारांवर कारवाई अटळ असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत. याबाबत 19 जुलैला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला दिल्लीतून वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल राव आणि राज्याचे प्रभारी रमेश चन्नीथला उपस्थित राहणार आहेत.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची आठ मते फुटल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही आमदारांनी भाजपला तर काहींनी अजित पवार गटाला मतदान केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या फुटीर आमदारांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी काँग्रेसमधून होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीने जनता आमच्यासोबत असल्याचे दाखवून दिले आहे, पण जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी दगाफटका करीत पक्षाशी बेइमानी केली आहे. पक्षातील बेइमान आम्हाला शोधायचे होते म्हणूनच आम्ही विधान परिषद निवडणूक लढवली. आता पक्षातील कचरा साफ होईल. या निवडणुकीमुळे आम्हाला पक्षातील भेदी शोधण्यात यश आलेय. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईलच.

गद्दारांना पक्षात स्थान नाही पटोले

गद्दारांची नावे वरिष्ठांना कळविण्यात आली असून त्यांचे विश्लेषण केले जात आहे. गद्दारांवर कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठांनीही सांगितले असून त्यांना भेटायला बोलावले जाणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.