लेह लडाखचा पाऊस

70

श्रीकांत उंडाळकर, [email protected]

मान्सून संपूर्ण हिंदुस्थानात पसरतो… पण हिमालय मात्र त्याला पुढे सरकू देत नाही. पाहूया लेह–लडाखचा पाऊस कसा असतो…

पाऊस… पाऊस म्हटलं की, मन कसं चिंब होतं. उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना प्रत्येक जीव ज्याची वाट पाहत असतो तो म्हणजे पावसाळा. पावसामध्ये प्रत्येक सजीवाचे नवीन आयुष्य सुरू होत असते. पाण्यामुळे सर्वत्र हिरवंगार झालेलं असतं. या पावसाची मजा लुटण्यासाठी मग अनेक जण आपल्या मित्रमंडळींसोबत किंवा कुटुंबीयांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्याचा बेत आखतात.

हा मान्सून हिंदुस्थानातीलच लडाख आणि स्पितीसारख्या भागात पोहोचत नाही. त्याचे कारण हिमालय पर्वताची रांग मान्सूनचे ढग अडवून धरते. त्यामुळे लडाख-स्पितीसारख्या ठिकाणी मान्सूनचे पाणी पोहोचत नाही. याउलट तिकडे बर्फाचा पाऊस असतो आणि तोदेखील डिसेंबरपासून सुरू होऊन फेब्रुवारी-मार्चपर्यंत स्नोफॉल होत असतो. त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात पावसाळा ऋतू सुरू असताना लडाख-स्पितीसारख्या भागात मात्र उन्हाळी वातावरण असते. सिमला, मनाली, कश्मीरचा वरचा भाग यासारख्या ठिकाणीदेखील डिसेंबर ते मार्चच्या दरम्यानच बर्फ पडतो. त्यामुळे बर्फाच्या पावसाचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा ठिकाणी त्या कालावधीत भेट द्यायला हवी. अशा बर्फाळ भागातील जीवन पण याच बर्फाच्या पावसावर अवलंबून असते. जम्मूमध्ये वार्षिक पावसापैकी ७१ टक्के पाऊस मान्सून काळात पडतो. मात्र, काश्मीर खोऱयात हेच प्रमाण २८ टक्के इतके कमी होते. एकाच राज्यातील जम्मू, कश्मीर आणि लडाख या तीन प्रदेशांमध्ये तीन भिन्न स्वरूपाचा पाऊस अनुभवायला मिळतो. त्याला अनुसरूनच या तिन्ही भागांतील जनजीवन आणि जैवविविधताही भिन्न आहे.

हिवाळ्यात पर्वतरांगांच्या माथ्यावर पडणारा बर्फ वितळून कश्मीर आणि लडाखमध्ये उन्हाळ्यात झरे वाहू लागतात. डोंगरउतारावर याच झऱयांचे पाणी अडवून लडाखमध्ये, तर कश्मीरमध्ये डोंगर उताराप्रमाणेच झेलम नदीच्या दुतर्फा शेती केली जाते. शेतीसाठी उन्हाळ्यात पुरेसे पाणी उपलब्ध होत असल्यामुळे येथील शेतकरी मान्सूनवर विशेष अवलंबून नाही. यावर्षी हिवाळ्यात कश्मीर आणि लडाखमध्ये पाच ते सहा फूट बर्फ पडला. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण बरेच असल्यामुळे झेलम आणि सिंधूच्या खोऱयातील शेतकरी समाधानी आहेत.

लडाखमधली शेती

या वर्षी हिवाळ्यात भरपूर बर्फवृष्टी झाल्यामुळे झेलम आणि सिंधू नदीच्या खोऱयातील शेतकरी यंदा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये समाधानकारक पीक हाती येणार म्हणून खुशीत आहेत. मान्सूनने काही दिवसांपूर्वीच जम्मू-कश्मीरच्या बहुतांश भागात प्रवेश केल्याचे हवामानशास्त्र् विभागाने (आयएमडी) जाहीर केले. हिमालयाच्या पर्वतरांगांवर हिवाळ्यात जमा झालेल्या पुरेशा बर्फामुळे झेलम आणि सिंधूच्या खोऱयातील लहान-मोठय़ा नद्या, ओढे-नाले सध्या खळखळून वाहत आहेत. लडाख आणि काश्मीर भागांत जूनअखेरीसच डोंगर पायथ्याशी बहरलेली शेते या भागाचे भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय वेगळेपण दाखवून देतात. लडाखमध्ये बार्ली, गहू, तसेच बटाटा, वाटाणा, शेलगम आदी भाज्यांचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. कश्मीरमध्ये नदीकिनारी भात, केशर, तर उंच प्रदेशांत सफरचंद, जर्दाळू, अक्रोड आदींची लागवड केली जाते.

केवळ ९९ मिलिमीटरचा प्रदेश

लेह-लडाख हा देशातील सर्वात कमी पावसाचा व कोरडा प्रदेश… तिथे वर्षांला केवळ ९९ मिलिमीटर इतकाच पाऊस पडतो. लेह-लडाख हा सर्वात थंड प्रदेश. तरीसुद्धा लडाखमध्ये पडणारा पाऊस व बर्फवृष्टीचे प्रमाण कमी आहे. ऑगस्ट महिन्यात तर सरासरी १५.४ मिलिमीटर इतकाच पाऊस पडतो. लेह-लडाखमध्ये एका दिवसातील पावसाचा आतापर्यंतचा उच्चांक ५१.३ मिलिमीटर इतकाच आहे. ही नोंद २२ ऑगस्ट १९३३ रोजी झाली होती.

प्रोजेक्ट मेघदूत

जम्मू कश्मीर आणि लडाख या प्रदेशातील पडणाऱया पावसाचा तेथील जनजीवन आणि निसर्गावर होणारा परिणाम प्रोजेक्ट मेघदूत या प्रकल्पाअंतर्गत अभ्यासण्यात येतो. जम्मू या हिमालयाच्या पायथ्याकडील प्रदेशापासून, झेलमकाठी विकसित झालेले कश्मीरचे खोरे आणि लडाख या देशातील सर्वात थंड आणि कोरडय़ा प्रदेशापर्यंत मान्सूनच्या सोबतीने प्रोजेक्ट मेघदूतचा प्रवास होत आहे. प्रोजेक्ट मेघदूतचे यंदा सातवे वर्ष असून, पुण्यातील सहा अभ्यासक या अभ्यासदौऱयामध्ये सहभागी झाले आहेत.

 

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या