बिबट्याच्या हल्ल्यात १७ शेळ्या ठार तर ६ गंभीर जखमी

78

विजय जोशी । नांदेड

नांदेड वन परिक्षेत्र हद्दीतील मेंडका तालुका मुदखेड शिवारातील एका गोठ्यात घुसून बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास शेळ्यांवर मोठा हल्ला केला. यात १७ शेळ्या ठार तर ६ गंभीर जखमी झाल्या आहे. वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय व पोलीसांनी या घटनेचा पंचनामा केला असून यात १ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. यावेळी शेळ्या मालक हा सुदैवाने बचावला असून हिंस्त्र प्राण्यांच्या मुक्त संचाराने परिसरातील शेतकरी व नागरीक भयभित झाले आहेत.

शेतकरी रहेमान आणि मिया यांनी मेंडका गावापासून काही अंतरावर असलेल्या शिवारातील त्यांच्या गोठ्यात शुक्रवारी रात्री आपल्या शेळ्या बांधल्या होत्या. गोठ्यापासून काही अंतरावरील पहाऱ्यासाठी तयार केलेल्या मचव्यावर ते झोपले होते. दरम्यान रात्री १२:३० वाजताच्या दरम्यान गोठ्यात अचानकपणे एक बिबट्या घुसला व त्याने आत बांधलेल्या शेळ्यांवर एकच हल्ला चढविला. या हल्ल्यात १४ शेळ्या व ३ बोकड असे एकूण १७ शेळ्या ठार झाल्या आणि ६ शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, शेळ्यांची आरडाओरड ऐकून रहेमान यांनी गोठ्याकडे येण्याचा प्रयत्न केला. परंतु बिबट्याच्या डरकाळ्या ऐकून त्यांनी तेथे जाणे टाळले. त्यामुळे ते सुदैवाने बचावले असून मयत व जखमी शेळ्यांचे अंदाजे १ लाखांपेक्षा आधिक नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नांदेड वन परिक्षेत्र अधिकारी आर.एल. पाटील, वनपाल घोडके, वन वनरक्षक कवळे, शेख यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. नांदेड वन परिक्षेत्रात १५ ते १६ बिबटे वाघ असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली असून अन्य हिंस्त्र प्राणी देखील असल्यामुळे शेतकरी व नागरीकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या