वेरूळ लेणी परिसरात बिबट्याचे दर्शन, पर्यटक व नागरिकांत दहशत

आज गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या वरील बाजूच्या डोंगरात असलेल्या तुट्टीच्या नाल्यामध्ये नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. यातील काही जणांनी या बिबट्याचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर टाकल्याने काही वेळातच या परिसरात बिबट्या आल्याची बातमी सर्वदूर पसरली. याची माहिती मिळताच वनविभागाने या परिसरात शोधमोहीम सुरू केली असून, पोलिसांनी या परिसरात गस्ती वाहन फिरवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, येथील शेतवस्तीवर बिबट्याने दोन बकऱ्या मारल्या.

आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वेरूळ लेणीतील लेणी क्रमांक एकच्या वर असलेल्या तुट्टीच्या नाल्यामध्ये बिबट्या असल्याचे रत्नपूर वेरूळ मार्गावरून जाणाऱ्या काही प्रवाशांना दिसून आले. यातील काही जणांनी दूरवरून त्याचे चित्रीकरण केले. यामध्ये बिबट्या निरखून पाहत थोडा वेळ थांबून डोंगराच्या वरील बाजूला दगडाच्या कपारीतून निघून गेल्याचे दिसून येते. हे चित्रीकरण काही वेळातच समाजमाध्यमांवर फिरू लागले. याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेहरकर यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना शोधमोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या.

यानुसार वनपाल कैलास जाधव एन. जी. तारे, प्रशांत निकाळजे, सोमनाथ बर्डे, भगवान करपे, मच्छिंद्र बारगळ, मयूर चौधरी यांनी या परिसरात जाऊन शोधमोहीम सुरू केली. वनविभागाच्या पथकाने लेणी क्रमांक 1, लेणी क्रमांक 32 च्या संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र या परिसरात बिबट्याचे अस्तित्व आढळून आले नाही.

वेरूळ लेणी परिसरात बिबट्या असल्याचे स्पष्ट होताच वेरूळ लेणी परिसरात जाणारे पर्यटक, या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच परिसरातील नागरिकांमध्ये चांगली दहशत पसरली आहे. याविषयी वनपरिक्षेत्र अधिकारी अण्णासाहेब पेरकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, रत्नपूर परिसरामध्ये विस्तीर्ण वनक्षेत्र असून या ठिकाणी बिबट्याचे अस्तित्व आहे. या बिबट्याने आतापर्यंत कोणालाही इजा पोहोचवलेली नाही. बिबट्या नागरी क्षेत्रात येत नसून काही नागरिकच वनक्षेत्रात जातात. त्यामुळे वन्य प्राणी बिथरतात़ नागरिकांनी वनक्षेत्रात जाऊ नये. वेरूळ लेणी परिसरातील काही पर्यटकही वनक्षेत्रात अनधिकृतरीत्या प्रवेश करतात हे त्यांनी टाळावे. वनविभाग याविषयी योग्य ती खबरदारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

याविषयी पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आम्हाला वेरूळ लेणी परिसरात बिबट्या आढळून आल्याची माहिती आज सकाळीच मिळाला. त्यानुसार आम्ही पोलीस वाहनांवरून या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या तसेच वनक्षेत्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेरूळ घाटाच्या खालील बाजूस असलेल्या योगेश रिठे यांच्या शेतवस्तीवरील दोन बकऱ्या या बिबट्याने मारल्याचे सकाळी उघडकीस आले.

आपली प्रतिक्रिया द्या