कराड-चिपळूण महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

कराड-चिपळूण महामार्गावर पाटण तालुक्यातील कोयना विभागातील नेचल गावच्या हद्दीत भराडवाडी (किसरुळे) गावाजवळ आज पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटय़ाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हेळवाक वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

आज पहाटे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मादी जातीच्या बिबटय़ाचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनास्थळी पंचनामा करून मृत बिबटय़ाचे शवविच्छेदन पाटण व ढेबेवाडीच्या पशुवैधकीय अधिकाऱयांनी केले. मृत बिबटय़ा चार ते पाच वर्षांचा असून, ती मादी आहे.

वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबटय़ाचे डोळे बाहेर आले होते. संरक्षित क्षेत्रात जनावरांना तयार केलेले सर्व पाणवठे आटले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ जनावरे जंगलाच्या बाहेर येत आहेत. या घटनेची माहिती पोलीस पाटील सागर जाधव यांनी दिली. हेळवाक वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, वनपाल भारत कुटाळे, रमेश वालकोळी, रासाटीच्या वन्यजीव वनरक्षक प्रियांका पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बिबटय़ाचा पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.