बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू, निफाडच्या तारुखेडलेची घटना

22
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, नाशिक

निफाड तालुक्यातील तारुखेडले येथे सोमवारी रात्री घराबाहेर अंगणात खेळणाऱ्या पाचवर्षीय बालिकेला बिबट्याने हल्ला चढवित ठार केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वनविभागाने आणखी दोन पिंजरे लावले आहेत.

तारुखेडले येथे शरद जगताप यांच्या शेतात अशोक हांडगे मजूरकाम करतात, त्यांची पाच वर्षांची मुलगी गुड्डी इतर मुलांसमवेत सायंकाळी साडेसात वाजता घराबाहेर खेळत होती. तेव्हा जवळच्या गव्हाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने गुड्डीवर झडप घालून तिला फरफटत ओढून नेले. इतर मुले आरडाओरड करीत आल्यानंतर हांडगे कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला. बऱ्याच वेळानंतर सुमारे दोनशे मीटर अंतरावर उसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

याबाबत वनविभागाला कळविल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. ढाकरे व पथक घटनास्थळी दाखल झाले. या भागात काही दिवसांपूर्वी एक पिंजरा लावलेला आहे. आज आणखी दोन पिंजरे लावण्यात आले. वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुरावा करून मुलीच्या आई-वडिलांना आठ लाखांची मदत जाहीर करण्यात आली, त्यापैकी एक लाख रुपये मदतीचा धनादेश तात्काळ त्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. मदतीच्या रकमेतील उर्वरित सात लाख रुपये फिक्स डिपॉझिट केले जातील, त्याचे दरमहा व्याज त्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती बी. आर. ढाकरे यांनी दिली. उपवनसंरक्षक रामानुजम, सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र कापसे यांनी पालकांची भेट घेवून सांत्वन केले, तसेच या परिसराची पाहणीही केली.

पावणेदोन वर्षात चार बळी

निफाड तालुक्यात ऑगस्ट २०१५पासून आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात चार बालकांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट २०१५मध्ये चापडगाव येथे चौथीत शिकणारा मुलगा, त्यानंतर काही दिवसातच शिंगवे गावी एक बालिका, सप्टेंबर २०१६मध्ये गोदानगरला चारवर्षीय मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. बिबट्याचा संचार असलेल्या भागातील ग्रामस्थांनी सायंकाळनंतर घराबाहेर पडू नये, मुलांना घराबाहेर खेळण्यास पाठवू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या