‘स्नो फॉल’ चा आनंद घेत होते पर्यटक…आणि अचानक समोर आला बिबट्या…

leopard

राज्यासह देशाच्या काही ठिकाणी बिबट्याची दहशत पसरली आहे. अनेकदा जंगलातून भक्ष्याच्या शोधासाठी बिबटे नागरी वस्तीत येतात. जनावरे आणि माणसांवर बिबट्या हल्ले करत असल्याने अनेक भागात त्याची दहशत आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लूच्या तीर्थन घाटामध्ये पर्यटक स्नो फॉलचा आनंद घेत असताना अचानक त्यांच्यासमोर बिबट्या आला. त्यामुळे पर्यटकांची घाबरगुंडी उडाली.

अचानक बिबट्या समोर आल्याने पर्यटक धास्तावलेले असतानाच बिबट्या मात्र निर्धास्त होत सगळ्यांकडे बघत होता. तो माणसांना पाहून बावचळला नाही किंवा चवताळला नाही. तो पर्यटकांशी खेळायला लागला. त्यामुळे पर्यटकांचीही भीड चेपली आणि तेदेखील बिबट्यासोबत खेळत सेल्फी घेत होते. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात बिबट्या कोणाच्या शर्टाची बाही खेचत आहे. तर कोणाच्या अंगावर चढत असल्याचे दिसून येत आहे.

बिबट्या हल्ला करत नसून तसेच आक्रमकपणा दाखवत नसून खेळत असल्याचे बघून त्याला बघण्यासाठी आणि त्याच्यासोबत खेळण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली. त्यामुळे या रस्त्यावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची माहिती वनविभागाला मिळाली. या बिबट्याने कोणालाही दुखापत केली नसल्याचे वनविभागाने सांगितले. अनेकजण बिबट्याशी खेळत होते आणि त्याच्यासोबत सेल्फी घेत होते. बिबट्याही त्यांच्याशी खेळत होता, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

तीर्थन घाटीजवळच हिमालयान नॅशनल पार्क आहे. कुल्लू घाटी आणि परिसरात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असल्याने थंडीच्या प्रकोपाने वन्य प्राणी निवासी भागात येतात. त्यामुळे वाढत्या थंडीमुळे बिबट्या तीर्थन घाटीत आला असावा, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गोठवणाऱ्या थंडीत माणसे दिसल्याने त्याची भीड चेपली असणार त्यामुळे तो आक्रमक झाला नाही किंवा चवताळला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बिबट्यासारखा आक्रमक वन्य प्राणी पर्यटकांसोबत खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही पर्यटकांनी बिबट्याला काही पदार्थही खाण्यासाठी दिले. ते त्याने शांतपणे खाल्ले. त्यानंतर थोडावेळ पर्यटकांसोबत घालवून तो पुन्हा जंगलाकडे परतला. बिबट्याशी खेळताना आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा वेगळाच अनुभव आल्याचे पर्यटकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या