बिबट्यांचा कळप घुसला रहिवासी कॉलनीत, हल्ल्यात एक गाय ठार

511
leopard

अमरावती येथे बिबट्याच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात एक गाय ठार झाली असून दुसरी गाय कळपाच्या हल्ल्यातून सुटल्यामुळे बचावली. ही घटना अमरावती चांदूर रेल्वे मार्गावर असलेल्या वैष्णवदेवी मंदिराजवळच्या हिलटॉप कॉलनी येथे घडली. बिबट्याच्या कळपाने बांगरे यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यात हल्ला केल्यानंतर हिलटॉप कॉलनी येथील रहिवासी केवळ पाहण्यापलिकडे काही करू शकले नाहीत.

अमरावती चांदूर रेल्वे मार्गावर वडाळी जंगल परिसर आहे. या जंगलात अनेक बिबटे आहेत. शुक्रवारच्या रात्री अंदाजे चार बिबट्यांचा कळप बांगरे यांच्या गोठ्यात घुसला. त्यावेळी गोठ्यात दोन गायी बांधल्या होत्या. बिबट्यांनी दोन्ही गायींवर हल्ला केला. मात्र त्याचवेळी एक गाय गोठ्यातून पळून जाण्यात यशस्वी ठरली. दुसरी मात्र बिबट्याच्या कचाट्यात सापडली. त्यावेळी बिबट्यांनी तिला गोठ्याच्या बाहेर ओढत नेले व तिची शिकार केली.

हिलटॉप कॉलनीत मोजकीच घरे आहेत. त्यामुळे या घरातील नागरिक बिबट्यांनी गायीवर केलेला हल्ला केवळ खिडकीतून पाहूच शकले. उल्लेखनिय म्हणजे वडाळी वनपरिक्षेत्रात असंख्य बिबटे असून ते अमरावती विद्यापीठ परिसरात नेहमीच फिरत असतात. यापूर्वी याच बिबट्यांनी आतापर्यंत चार जनावरांची शिकार केली आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. शिकार केलेली गाय पुन्हा खाण्यासाठी हेच बिबटे येणार असल्याचा संशय असल्यामुळे हिलटॉप कॉलनीत ठिकठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या