नवीन वर्षात सीएनजीच्या रांगा कमी होणार

42

पुणे : येत्या वर्षात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएलजीएल) कंपनीतर्फे शहरात नवीन १० सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात सीएनजीसाठी लागणार्‍या रांगा कमी होणार असून, याचा रिक्षाचालकांना फायदा होणार आहे. सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात ४२ सीएनजी पंप असून, यात नव्याने १० पंपांची भर पडणार आहे. यासाठी शहरातील विविध जागांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, या जागा मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शहरातील ५५ हजार रिक्षांपैकी ४५ हजार सीनजीवर चालतात. त्यामुळे सीनजी गॅस भरण्यासाठी नेहमीच शहरातील सीएनजी पंपावर मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात. येत्या वर्षात नव्याने दहा सीनजी पंप उभारणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील सीएनजी पंपांची संख्या आता ५२ व पोहचणार आहे. वाहनांची संख्या पाहता सध्या ७० सीनजी पंपांची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर यांनी दिली.
पुणे शहरात एकूण २६ सीएनजी पंप असून, यातील शिवाजीनगर हा एकच पंप मध्यवर्ती ठिकाणी आहे, तर इतर पंप उपनगरांमध्ये आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये १६ सीएनजी पंप आहेत. नवीन वर्षात हे पंप सुरू होतील, असे तांबेकर म्हणाले.

एलपीजीच्या जागी सीएनजी
– शहरात दहाच्या वर एलपीजी पंप आहेत. याठिकाणी वाहनांमध्ये फक्त एलपीजी गॅस भरला जातो. मात्र, आता एलपीजी वापरणार्‍या वाहनांची संख्या खूप कमी झाली आहे. सर्व वाहने सीएनजीचा वापर करत आहेत. त्यामुळे या पंपांच्या जागेवर सीएनजी पंप सुरू करायला हवेत, अशी मागणी रिक्षा पंचायतीने केली होती. त्यानुसार आरटीओ कार्यालयासमोरील एलपीजी पंपावर सीएनजी पंप सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजीनगर येथील सीएनजी पंपावरील ताण कमी झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर एलपीजी पंपचालकांशी चर्चा करून सीएनजी पंप सुरू करण्याबाबत प्रयत्नशील राहण्याचे आश्‍वासन एमएनजीएलने दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या