इयत्ता सातवीतच स्पर्धा परीक्षेचे धडे, उंदीरवाडी शाळेचा ‘जागर स्पर्धा परीक्षांचा’ उपक्रम

32

सामना ऑनलाईन, येवला

आजकाल कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर स्पर्धा परीक्षेशिवाय पुढे जाताच येत नाही. मग ते क्षेत्र वैद्यकीय, अभियांत्रिकी, प्रशासकीय सेवा असो की परदेशातले शिक्षण असो, विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना पर्याय उरलेला नाही. त्यामुळे विद्यार्थीदशेतच जर या स्पर्धा परीक्षांची योग्य वेळी योग्य अशी माहिती मिळाली तर… नेमकी हीच बाब ओळखून भविष्यातील आव्हानांचा वेध घेऊन सक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी उंदीरवाडी शाळेने ‘जागर स्पर्धा परीक्षांचा’हा उपक्रम यशस्वीपणे राबवला.

या उपक्रमांतर्गत दररोज मुलांना १० प्रश्न दिले जात होते. मुलांनी त्याची उत्तरे स्वतः शोधायची असे ठरले. विशेष म्हणजे मुलांनी ग्रामीण भाग असूनही मोबाईलच्या आधारे इंटरनेटचा वापर करून स्वतः प्रश्नांची उत्तरे शोधली. आता अभ्यास तर चालू झाला, पण अधिकारी होण्यासाठी नेमकं काय करायला हवं? कशा प्रकारे वाचन, तयारी करायला हवी? या बाबी लक्षात येण्यासाठी प्रत्यक्ष महिला व बालविकास अधिकारी झालेले रणजित कुहे यांना शाळेत बोलावण्यात आले. यावेळी मुलांनी स्वतःहून अनेक प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. त्यातून मुलाखत कशी घ्यावी लागते याचाही अनुभव मुलांना आला. सुनंदा जिल्हाधिकारी होते… हा पाठ केवळ पुस्तकात न राहता जिल्हाधिकारी होण्यासाठी काय करावे लागते ते यावेळी बोलताना कुहे यांनी मुलांना सांगितले.

वर्तमानपत्रातील विविध स्पर्धा परीक्षांची माहिती देणाऱ्या कात्रणांचा संग्रह करण्यात आला. त्यांचे वाचन करून त्यांना माहिती दिली जाते. तो एक अनमोल ठेवा तयार झालाय जो पुढील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल. मुलांची ध्येय पहिली तर कुणाला नौदलात, लष्करात, तर काहींना प्रशासकीय सेवेत जायचंय. यशस्वी झालेल्या उमेदवारांच्या कथा वाचून दाखवल्या जातात. वर्षाच्या शेवटी संपूर्ण प्रश्नांवर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेतली गेली. मुलांना त्यातून स्पर्धा परीक्षांचा अंदाज आला.
पुढील वर्षी लोकसहभागातून अधिकाधिक डिजिटल साधने (टॅब, लॅपटॉप) मिळवून तंत्रज्ञानाचा यात वापर करण्याचा प्रयत्न आहे. समाजाने या उपक्रमाला भरीव मदत करावी असे आवाहन करीत त्यातून इ-रीडर,इ-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा कक्ष उभारता येईल, असे मुख्याध्यापक महावीर गडदे म्हणाले. वर्षभर हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी महादेव खरात यांनी उत्तम नियोजन केले तर अजिनाथ आंधळे, वंदना शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले.

आपली प्रतिक्रिया द्या