लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर अयूबचा खात्मा

229

सामना ऑनलाईन । पुलवामा

सुरक्षा पथकाने जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काकपोरा येथे लष्कर ए तोयबाच्या कमांडर अयूब लेलहारी याचा खात्मा केला. याच भागामध्ये २२ जून रोजी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. दहशतवादी मजिद मीर, शरीक अहमद आणि इरशाद अहमद यांना ठार करण्यात आले होते.

सुरक्षा जवानांना लेलहारी एका घरामध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून शोध मोहीम तीव्र केली. शोध मोहिमेमध्ये ४७व्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि जम्मू-कश्मीर पोलिसांचे विशेष ऑपरेशन पथक सहभागी झाले होते. शोधमोहिमेदरम्यान दहशतवादी लेलहारीने जवानांवर गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात लेलहारी ठार झाला. लेलहारी ज्या घरात लपलेला तिथून एक एके-४७ रायफल जप्त करण्यात आल्याची माहिती जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी वैद्य यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून सैन्याने कश्मीरमध्ये ‘ऑपरेशन ऑल आऊट’ सुरू केले आहे. घुसखोरी रोखणे आणि जम्मू-कश्मीरमध्ये दबा धरुन बसलेले सर्व दहशतवादी ठार करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत १३० पेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांच्या कमांडर आणि सदस्यांच समावेश आहे.

हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणी याच्या खात्म्यानंतर अबू दुजाना आणि यासीन इत्तू यांचाही ‘ऑपरेशन ऑल आऊट’ या मोहिमेदरम्यान खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या