लश्कर-ए-तोयबाचा अतिरेकी अब्दुल नईम जेरबंद

22

प्रवीण हत्तेकर । संभाजीनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात मोठा घातपात करण्याचा डाव आज पोलिसांनी उधळला. लश्कर- ए- तोयबाचा खतरनाक अतिरेकी अब्दुल नईम उर्फ समीर याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. नईम हा महाराष्ट्रातील संभाजीनगरचा असून मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू जिंदाल उर्फ जबीउद्दीन अन्सारी याचा अत्यंत विश्वासू सहकारी आहे. नईमला एनआयएच्या ताब्यात देण्यात आले असून त्याने कश्मिरातील लष्करी तळ तसेच ऊर्जा प्रकल्पांची रेकी केल्याचेही तपासात समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची निवडणूक लढवल्यापासून वाराणसी अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आले आहे. वाराणसीत मोठा घातपात घडवून आणण्यात हालचाली सुरू असल्याचा इशारा गुप्तचरांनी दिला होता. काल उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई करत वाराणसीत घातपात घडवण्याचे षड्यंत्र उधळून लावले. या प्रकरणात लश्कर ए तोयबाचा खतरनाक अतिरेकी अब्दुल नईम उर्फ समीर याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात दिले आहे.

२४ ऑगस्ट २०१४ रोजी कोलकात्याहून मुंबईला आणताना छत्तीसगडमध्ये पोलिसांना चकमा देऊन नईम फरार झाला होता. नईमला शोधण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले, पण त्याचा ठावठिकाणा लागला नाही. नईम बांगलादेशमार्गे पाकिस्तानात गेला. तेथे अडीच वर्षे काढून तो पुन्हा हिंदुस्थानात परतला.

– गंगा आरती निशाण्यावर
वाराणसीत हिंदू भाविकांची कायम गर्दी असते. तसेच हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे लश्कर ए तोयबाने वाराणसीला टार्गेट करण्याचे षडयंत्र रचले. वाराणसीत घातपात घडवण्याची जबाबदारी नईमवर सोपवण्यात आली होती. वाराणसीत घाटावर होणाऱ्या गंगाआरतीला निशाणा बनवण्याच्या सूचनाही त्याला देण्यात आल्या होत्या अशी माहिती एनआयएच्या सुत्रांनी दिली.

– आईने हेबियस कॉर्पस केली होती
२०१४ मध्ये पश्चिम बंगाल पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अब्दुल नईम फरार झाला. त्यावेळी त्याची आई नसरीन हिने पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलाचे एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप केला होता. नईमला शोधून आणण्यासाठी तिने न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिकाही दाखल केली होती.

– एनआयएचे पथक संभाजीनगरला येणार
उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई करत लश्कर ए तोयबाचा अतिरेकी अब्दुल नईमला जेरबंद केले. नईमला पुढील चौकशीसाठी एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक चौकशीसाठी एनआयएचे पथक संभाजीनगरला येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

– नईमचे संभाजीनगर कनेक्शन
अब्दुल नईम हा संभाजीनगरचा रहिवासी असून जिन्सी भागात त्याचे घर आहे. नईम उच्चशिक्षित असून त्याला वेरूळ स्फोटके प्रकरणात अटक करण्यात आली होती. हैदराबादेतील मक्का मशिदीत झालेल्या धमाक्याचा तो मुख्य आरोपी आहे. जबीउद्दीन अन्सारी, फय्याज कागजी यांच्या टोळीचा तो सदस्य आहे.

– कश्मीर, हिमाचलमध्ये रेकी
एनआयएने केलेल्या अधिक चौकशीत अब्दुल नईम हा पाकिस्तानातून कश्मीरमार्गे हिंदुस्थानात घुसला. अगोदर त्याने कश्मिरातील लष्करी तळाची रेकी केली. त्यानंतर तो हिमाचल प्रदेशात कसौली येथे गेला. तेथेही त्याने रेकी केली. कसौलीत इस्रायली तसेच इतर परदेशी पर्यटकांना निशाणा बनवण्याचा त्याचा इरादा होता. दिल्ली, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेशातही घातपात घडवून आणण्याचा कट नईमने रचला होता, असेही तपासात समोर आले आहे.

– दुसरा हेडलीच
अब्दुल नईमला लश्कर ए तोयबात दुसरा हेडली म्हणूनच ओळखले जाते. मुंबई हल्ल्याच्या अगोदर डेव्हीड कोलमन हेडली याने मुंबईत राहून अशीच रेकी केली होती. अब्दुल नईम हा देखील रेकी करण्यात अत्यंत वाकबगार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या