डोनाल्ड ट्रम्प यांना अज्ञाताने पाठवले विषाचे पाकीट, अमेरिकेत प्रचंड खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अज्ञात व्यक्तीने अत्यंत घातक स्वरुपाच्या विषाचे पाकिट पाठवल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असतानाच हा प्रकार घडला आहे. संबंधित पार्सल कॅनडातून आल्याचा संशय आहे. ते कोणी पाठवले व यामागे अमेरिकेतील कोणी व्यक्ती आहे का, याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याच नावाने हे पार्सल पाठवले गेले आहे. या पार्सलबाबत संशय येताच व्हाईट हाऊसच्या प्रवेशद्वारावरील पोलिसांनी ते जप्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पार्सलमध्ये ‘रिसीन’ नावाचे अत्यंत घातक विष आहे. त्याची पुष्टी करण्यासाठी दोन चाचण्या करण्यात आल्या आहेत. हे पार्सल कॅनडातून आल्याचा दाट संशय आहे. त्याच अनुषंगाने ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन’ (एफबीआय), सिक्रेट सर्व्हिस तसेच अमेरिकन पोस्टल इन्स्पेक्शन सर्व्हिस या सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तरित्या तपास सुरू केला आहे. दरम्यान, अमेरिकेतील जनतेच्या सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचे एफबीआयच्या सुरक्षा अधिकाऱयांनी रविवारी स्पष्ट केले.

दहशतवादी हल्ल्यासाठी वापरले जाते ‘रिसीन’

पार्सलमध्ये सापडलेल्या ‘रिसीन’ विषाचा दहशतवादी हल्ल्यासाठी वापर केला जातो. पावडर, मिस्ट किंवा ऑसिडच्या रुपात त्याचा उपयोग केला जातो. हे विष खाल्ल्याने व्यक्तीला उलटय़ा, पोट आणि आतडय़ातून प्रचंड रक्तस्राव सुरू होतो. तसेच लिव्हर आणि किडनी निकामी होऊन व्यक्तीचा मृत्यू होतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून बिडेन यांना सर्वाधिक पसंती, ट्रम्प यांचा स्वप्नभंग होणार

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीवर पुन्हा बसण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्न भंगण्याची चिन्हे आहेत. देशातील नागरिकांनी ’पॉप्युलर पोल’मध्ये भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दिली आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत बिडेन यांना 9 टक्क्यांनी अधिक नागरिकांची पसंती लाभली आहे.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याचदरम्यान 11 ते 15 सप्टेंबर या कालावधीत नागरिकांतून ’ओपिनियन पोल’ घेण्यात आला. या जनमत चाचणीचा अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. चाचणीच्या अहवालानुसार, 50 टक्के मतदारांनी जो बिडेन यांच्या बाजूने कौल देणार असल्याचे सांगितले, तर 41 टक्के मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ मतदान करण्यास पसंती दर्शवली. तसेच तीन टक्के मतदारांनी त्रयस्थ उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या