मोदीजी, रिफायनरी प्रकल्प रद्द करा; नऊ सरपंचाचे पंतप्रधानाना पत्र

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

नाणार येथील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असताना सरकार स्थानिकांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करत रिफायनरी प्रकल्प रेटत आहे. रिफायनरी प्रकल्पाविरुध्द परिसरात शासनाच्या विरोधात संतापाचे वातावरण तयार झाले असून कोकणच्या मुळावर आलेला हा विनाशकारी प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी नाणार परीसरातील नऊ सरपंचांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात पंतप्रधान मोदींना नऊ सरपंचानी एक पत्र पाठविले आहे.

या पत्रात निसर्गरम्य कोकण परीसरात असलेल्या नाणारसहीत चौदा गावांचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी मुंबईच्या मनिऑर्डरवर विसंबून असलेल्या कोकणाने आता स्वत: आपली प्रगती साधली आहे. येथील आंबा, काजू, फणस यासहीत अन्य फळे, मासे अशा उत्पादनावर कोकणात रोजगाराची साधने उपलब्ध झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे सव्वा लाखाच्या दरम्यान नेपाळ, केरळ आदी भागातुन लोक रोजगारासाठी मागील काही वर्षात वास्तव्याला आहेत. या व्यतिरिक्त राज्याच्या अन्य भागातुन देखील नागरीक आपल्या उपजीविकेसाठी कोकणात येत असतात. कोकणात रोजगार उपलब्द असताना असे मोठे प्रकल्प आणण्याची अवश्यकता नाही, असे या पत्रातून पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनाला आणून देण्यात आले आहे.

नियोजीत प्रकल्पासाठी प्रशासनाने सुमारे पंधरा हजार एकर जमीन अधिग्रहण करण्याच्या नोटीसा स्थानिक प्रकल्पग्रस्त जनतेला बजावल्या आहेत. नाणार परीसरातील सोळा गावात पंचवीस हजाराहुन अधिक कुटुंबे रहात असून मोठ्या प्रमाणात आंब्याच्या बागा आहेत. तर दोन ते तीन हजारच्या दरम्यान मच्छीमार आपला व्यवसाय करीत आहेत. येथील जनतेचा या प्रकल्पाला प्रखर विरोध असताना देखील शासन तो न जुमानता प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पंतप्रधानाना पाठविलेल्या पत्रात करण्यात आला आहे. आमचा विकासाला अजिबात विरोध नाही. मात्र कोकणला उपयुक्त ठरतील असेच कल्याणकारी प्रकल्प येथे आले पाहिजेत अशी अपेक्षा देखील त्या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

जगातील सर्वात मोठ्या अशा या रिफायनरी प्रकल्पापासुन सुमारे एक किमी अंतरावर देशातील सर्वात मोठा असा सुमारे दहा हजार मेगावॅटचा अणूऊर्जा प्रकल्प यापुर्वीच आलेला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. रिफायनरी प्रकल्प तात्काळ रद्द करा, अशी आग्रही मागणी या पत्रात करण्यात आली आहे. हे पत्र नाणारचे सरपंच ओमकार प्रभुदेसाई, तारळ – चौकेचे सरपंच बाळकृष्ण हळदणकर, सागवेचे अहमद मज्जीद काझी, साखरचे दशरथ मांजरेकर, उपळेचे दुर्गादास घाडी, विलयेचे अजय तावडे, पडवेचे विनोद मेस्त्री, डोंगरचे विजय अमरे व कुंभवडेचे पंढरीनाथ मयेकर यांच्या नावे व स्वाक्षऱ्यांसह पाठवले आहे.