मातोश्रींना पत्रे!

183

>> डॉ. विजय ढवळे

आचार्य अत्र्यांनंतर महाराष्ट्रावर जबरदस्त गारुड करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. साहित्य, रंगभूमी आणि चित्रपट या क्षेत्रांत त्यांनी अजोड कामगिरी बजावली. ते स्वतः तर उत्कृष्ट साहित्यिक होतेच, पण त्यांचे वैशिष्टय़ म्हणजे इतरांच्या लिखाणालाही दाद देण्यास त्यांना संकोच वाटत नसे. त्यांचे वाचन अफाट होते. ‘लेटर्स टू मदर’ या चार्लस् व्हॅन डोरेनच्या पुस्तकामुळे ते इतके प्रभावित झाले होते की त्यावर त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये एक लेखही लिहिला होता. त्याला आता तीन तपे लोटली. नुकतेच ग्रंथालयात ते पुस्तक हाती लागले व त्यामुळे भारावून गेलो. युरोपात तसेच अमेरिकेत अनेक असामान्य व्यक्ती होऊन गेल्या. राजकारणी, वैज्ञानिक, साहित्यिक, क्रांतिकारक, धाडसी वीर, संगीतकार, कवी, चित्रकार विविध विषयांत सर्वांगीण प्रावीण्य मिळवणारी ही माणसे. त्यांनी आपल्या जन्मदातीला लिहिलेली पत्रे एकत्रित स्वरूपात या पुस्तकात वाचायला मिळतात. मुळात असा संग्रह प्रसिद्ध करणे हीच भन्नाट कल्पना. ती प्रत्यक्षात उतरवण्यात प्रचंड मेहनत, संशोधन, प्रवास या गोष्टी आल्याच. पत्रे हा फार मोलाचा ऐवज असतो. कारण त्यामुळे इतिहासावर झगझगीत प्रकाश पडतो.

आपली कौटुंबिक व्यवस्था इतकी अलवचिक व बद्ध स्वरूपाची होती की त्यात मनमोकळे करून पत्र लिहिणे या गोष्टीचा समावेशच नव्हता. पूर्वी राजदरबारातून सांडणीस्वारांमार्फत खलित्यांची देवाणघेवाण व्हायची, तितकीच. विसाव्या शतकातल्या हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. गांधीजी किंवा बाबासाहेब यांच्या मातोश्रींचे फारसे शिक्षणच झाले नसल्याने त्यांच्या सुपुत्रांनी त्यांना पत्र पाठवण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, तर लताबाईंच्या समवेत त्यांच्या मातोश्री कै. माईसाहेब सदैव राहिल्याने त्यांच्याही बाबतीत मातृदेवतेला पत्र लिहिण्याचा कधी प्रसंग आलाच नाही. सध्या फेसबुक, व्हॉटस्ऍप, स्मार्ट फोन, ईमेल, फॅक्स आणि इतर इतकी साधने उपलब्ध आहेत की पत्रलेखनच इतिहासजमा होईल अशी भीती वाटते.

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असे मानणारी हिंदुस्थानी संस्कृती, तिच्या आधुनिक वारसदारांना आपल्या मातोश्रींना वृद्धाश्रमात डांबून ठेवण्यात दिक्कत वाटत नाही ही शरमेची गोष्ट आहे. परंतु अमेरिकेचा पहिला अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन याने त्याच्या आईला लिहिलेले पत्र तसे कडकच म्हणायला हवे. तिला आपल्या मुलासमवेत राहण्याची इच्छा असावी. पण ती समजल्यानंतर वॉशिंग्टन म्हणतो, ‘माझ्याकडे आल्यास तुला काही पथ्ये पाळावी लागतील. बाहेर येताना व्यवस्थित पोषाखात येणे किंवा कसेही गबाळय़ासारखे येणे किंवा बंगल्यामध्ये तुझ्याच दालनात कैदी होऊन बसणे. पैकी पहिले पथ्य तुला आवडणार नाही. दुसरे, गबाळय़ासारखे येणे मला आवडणार नाही. तेव्हा उरला तिसरा पर्याय. माझे घर म्हणजे खानावळ आहे. इथे रात्रंदिवस अनोळखी लोकांची वर्दळ असते. ते तुझ्या पचनी पडणारे नाही. कारण या वयात तुला शांतता व स्वास्थ्य हवे आहे. तेव्हा आपल्या शेतीवाडीची जबाबदारी नोकरचाकरांवर सोपवून आरामात निवृत्तीचे आयुष्य जग. खर्च होऊ दे, परंतु ताण पडता कामा नये. सुख हे मनाचा समतोल राखण्याने मिळते, पैसा व सत्तेमुळे नाही!’

इटालियन क्रांतिकारक मॅझिनी यांची दोन सुरेख पत्रे आहेत, ‘प्रिय आत्या’ असा मायना आहे. कारण तो तेव्हा स्वित्झर्लंडमध्ये भूमिगत अवस्थेत राहात होता. पत्रात मॅझिनीने ‘माझ्या चळवळीचा मुख्य उद्देश मालक व नोकर हे संबंधच इतिहासजमा करणे आहे हे स्पष्ट केले आहे. तुम्हाला चांगला माणूस हवा असेल तर त्याला मुक्त करा. बरोबरीने वागवा. त्याच्यामधली अस्मिता जागवा.’ पण या महापुरुषाचा कम्युनिस्ट विचारसरणीला विरोध आहे. १८३५ साली, सरंजामशाहीच्या काळात असे प्रगल्भ विचार त्याने मांडले. त्या वेळी हिंदुस्थानात अस्पृश्यता नांदत होती तर अमेरिकेत गुलामगिरी अस्तित्वात होती. अशा काळात मॅझिनी किती दूरदृष्टीचा होता हे सिद्ध करायला त्याची पत्रे साक्षी आहेत. लेनिन सायबेरियात बंदीवान होता तेव्हा त्याने कैदखान्यात जागा अपुरी असल्याने कमी हालचाल होऊन वजन वाढते. त्यावर उपाय म्हणजे रोज ५० सूर्यनमस्कार घालणे. त्यामुळे शरीरात ऊब वाढते व थंडी कमी होते. हे आपल्या आईला कळवले होते. त्याचबरोबर वाचण्याकरता ग्रंथांची भली मोठी यादी देऊन ते लवकरात लवकर पाठव असेही विनवले होते!

रस्किन हा थोर विचारवंत म्हणून गाजला. त्याला ६०व्या वर्षी केम्ब्रिज विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट देण्याचे ठरवले. समारंभ लॅटिनमध्ये झाला. त्यामुळे त्यातला एकही शब्द रस्किनला कळला नाही. पण त्या दुःखापेक्षा समोर सुंदर मुली बसल्या होत्या. त्यांना माझा मोठेपणा समजला नाही त्या वेदना अधिक तीक्र होत्या, असे रस्किनने गमतीत त्याच्या आईला लिहिले. त्या पत्रात श्रोतृवर्गामधील एक मुलगी किती सुस्वरूप होती, यावरही त्याने काही ओळी खर्च केल्या आहेत. इंग्लंडमध्ये ग्लॅडस्टोन आणि डिझारायली हे दोघे पंतप्रधानकीचे मुख्य दावेदार असायचे. मतदारांचा कौल नेहमी आलटून पालटून पडायचा. बेंजामिन डिझरायली हा टोरी (हुजूर) पक्षाचा असल्याने व्हिक्टोरिया राणीचा त्याच्याकडे विशेष कल असायचा. हा एकदा ग्रनाडा या वेस्ट इंडियन बेटावर गेला. ते स्पॅनिश अमलाखाली होते. तेथील स्पॅनिश रूपवती तरुणींचे त्याने मिटक्या मारीत पत्रात वर्णन केले आहे. इथले जेवण हे इंग्रजांना पचत नाही अशी तक्रार मी सर्वत्र ऐकतो. पण मी मात्र हवे ते खातो आणि भूक वाढतच चालली आहे. हे त्याने आईला कळवल्यावर तिने निश्चितच समाधानाचा सुस्कारा सोडला असेल.

मार्क ट्वेन हा विनोदी लेखक. त्यामुळे त्या गुणाचे प्रतिबिंब त्याच्या पत्रात पडणे साहजिकच आहे. केरुक या गावात तो सुटीकरता गेला होता. तेथे त्या वर्षीचा उन्हाळा अतिकडक होता. त्याचे वर्णन ट्वेन करतो- ‘माझ्या शर्टावर आइस्क्रिम सांडले तरीही भोवतालचे ऊन इतके प्रखर होते की या शर्टाला भोक पडलेच! जेकिन्सबाई मला सांगत होत्या, त्यांचा स्वयंपाक सध्या चुलीवाचूनच होतो. टेबलावर संगमरवरी आच्छादन आहे. ते इतके तापते की त्यावर नुसते भांडे ठेवण्याचाच अवकाश. जेवण शिजून तयार. मर्तिकाच्या वेळेस नातेवाईकांना रडण्याची परवानगी नाही. कारण फर्निचरवर अश्रू पडले तर तिथे जळल्याचा डाग पडतो!’ वेंडेल होम्स हा प्रसिद्ध डॉक्टर. तो आईला सांगतो- ‘रोग बरा होणे ही जिवंत प्रक्रिया आहे. ते मनाच्या अवस्थेवर अवलंबून असते. युद्ध जिंकलेल्या सैनिकाला झालेली जखम ही युद्ध हरलेल्या सैनिकाच्या जखमेपेक्षा लवकर बरी होते. मी सध्या नवीन वैद्यकीय उपकरणे बनवतो आहे. आश्चर्य म्हणजे ज्या गोष्टी मला तरुणपणी अवघड वाटायच्या, त्या आता सहज जमतात. स्वतःच्या हातांनी उद्योग करणे यासारखे दुसरे समाधान नाही.’

आगासीझ हा निसर्गशास्त्रज्ञ. त्याने ४०० ग्रंथ लिहिले. अनेक अरण्ये, जंगले, सरोवरे, नद्या पालथ्या घातल्या. त्यापैकी एका साहसी प्रवासाच्या प्रारंभी त्याने आईला लिहिले, ‘मी अमेझॉन नदीत असलेल्या माशांविषयी संशोधन मोहिमेवर आहे. माझ्या संशोधन कार्यात अनेक मित्रांचे, विद्यापीठाचे तसेच अपरिचितांचेही सहाय्य झाले. त्यांचे ऋण फेडण्याची संधी या दृष्टीने मी काम करीत आहे.’ समाजऋण फेडण्याच्या उदात्त कल्पनेने भारलेल्या शास्त्रज्ञाला त्याचा मनोदय प्रथम आईला कळवावासा वाटला. नर्सिंगमधले श्रेष्ठ नाव फ्लॉरेन्स नायटिंगेल. रणभूमीवरून ती आईसमोर आपले मन उघडे करते, ‘जीवनावर प्रेम करणे म्हणजे काय हे मला आता कळले. त्यामुळे हे जीवन सोडून जाताना मला निश्चितच वाईट वाटेल. कार्लाईल, थोरो, इमर्सन, मेकॉले, नित्शे यांच्यासारख्या श्रेष्ठ विचारवंतांनी आईपुढे आपले सर्व मोठेपण बाजूला सारले आहे. आश्चर्य म्हणजे कलावंत- चित्रकार, संगीतकार पत्रात आपल्या कलेविषयी लिहितात. पण साहित्यिक केवळ भारदस्त शैली वापरतात, पण स्वतःभोवतीच दिवे ओवाळून घेतात!

शिवाजी महाराज हे युगपुरुष होते तसेच कमालीचे मातृभक्तही होते. तसेच यशवंतराव चव्हाणदेखील. अर्थात त्यांनी आपल्या आईला पत्रे लिहिल्याचे ऐकिवात नाही. १९९५ साली युतीचे महाराष्ट्रात राज्य आले. रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात होता. त्यांची मुलाखत घेताना एका पत्रकाराने म्हटले- तुम्हाला मान, कीर्ती, सत्ता, पैसा सर्वकाही मिळाले. कुठली उणीव भासते का? तेव्हा भावनारुद्र होऊन बाळासाहेब म्हणाले- ‘हे सर्व यश आणि वैभव पाहायला आई नाही. हे माझ्या आयुष्यातले सर्वात मोठे शल्य आहे!’ संस्कृत सुभाषित सांगते- य मातुः परदैवतम्. आईसारखे दुसरे दैवत नाही. आणि ते त्रिकालाबाधित सत्य आहे.

(लेखक कॅनडास्थित उद्योजक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या