तूळ

3423

‘पुराचा लोट अडविण्यात अर्थ नसतो. तो आपोआप जिरून जावा लागतो. प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण भलते धाडस नको.’

मनात एखादी गुप्त चिंता घेऊन तुम्ही दिवाळी साजरी करणार आहात. नरक चतुर्दशीच्या दिवशी मन अस्थिर होईल. सुरुवात उदासीनतेने होईल, परंतु लक्ष्मी-कुबेर पूजन व दिवाळी-पाडवा तुमच्या पद्धतीने साजरा करता येईल. भाऊबीजेच्या दिवशी एखादी खूशखबर मिळेल. तूळ राशीच्या व्यक्ती सुख असो वा दुःख याचे प्रदर्शन करीत नाहीत. त्यामुळे या वर्षात काही समस्या तटस्थपणे राहून सोडवाव्या लागतील. प्रसंगी भावनाशील व्हाल तर कधी तडजोड स्वीकारावी लागेल. आध्यात्मिक क्षेत्रात मात्र पुढचे पाऊल गाठता येईल. विशेष अनुभव काहींना मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या क्षेत्रात सावधपणे बोला व निर्णय घ्या. एकदम मोठी उडी घेणे शक्य होईल तशीच घ्या. वर्षभर तुळेच्या व्ययस्थानात म्हणजे कन्येत गुरू महाराज राहणार आहेत. २६ जाने. २०१७ शनी महाराज धनु राशीत प्रवेश करणार आहेत. तेव्हा तूळ राशीची साडेसाती संपणार आहे. २० जून ते २५ ऑक्टोबरमध्ये वक्री होऊन वृश्चिकेत येईल व नंतर मार्गी होऊन २६ ऑक्टोबर २०१७ ला धनुमध्ये जात आहे. २० जून ते २५ ऑक्टोबर हा कालावधी कसोटीचा असेल. परीक्षा अवघड असली तरी अशक्य नाही. समतोल वृत्तीच्या तूळ राशीत सर्व सांभाळता येईल. कर्क राशीत राहू व मकर राशीत केतू १८ ऑगस्ट २०१७ प्रवेश करीत आहेत. तुम्हाला हानीकारक फारसे ठरणार नाही. आजूबाजूला घडणाऱया घटनांचा प्रभाव तुमच्या जीवनावर, मनावर होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रातील निर्णय जुन्या अनुभवाच्या जोरावर घेता येईल. नोकरीत तणाव होईल, बदल करणे कठीण होईल. व्यवसायात अपरिचित व्यक्तीबरोबर कोणताही व्यवहार करणे धोक्याचे ठरेल. ध्येय स्वतःच्या हिमतीवर गाठावे लागेल. कुणीतरी ‘गॉडफादर’ मिळेल या भरवशावर राहून स्वतःची फसगत करून घेऊ नका. मग क्षेत्र कोणतेही असो. १२ सप्टें. २०१७ तूळ महाराज तूळ राशीत येतील आणि तुमचा मार्ग स्वच्छ होईन. पुढे जाण्यासाठी मुद्देसूद भविष्य पुढे पाहूया.

राजकीय-सामाजिक क्षेत्र:

राजकीय-सामाजिक क्षेत्रात कार्य करताना वेगळय़ा प्रकारचे अनुभव येतील. तुमच्याकडून अनवधानाने एखाद्या कार्याकडे दुर्लक्ष होऊ शकेल. चौफेर कार्य करण्याचा प्रयत्न करा. फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करा. २७ जाने. २०१७ ला तुमची साडेसाती संपेल. फेब्रु., एप्रिल व मेमध्ये तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होईल. आर्थिक मदत मिळण्यास वेळ लागेल. हिशोबात दक्ष रहा. विरोधकांना कमी लेखू नका. जाने. व एप्रिलमध्ये प्रवासात सावध रहा. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव वाढेल. डिसें., मार्च, जून, जुलैमध्ये थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कार्याचे कौतुक होईन. मान-सन्मानाचा योग येईल. या वर्षात प्रतिस्पर्धी वाढतील. समाजकार्याचा ठसा मात्र उमटेल. आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर संकटावर मात करू शकाल. जाने., फेबु. व जून मोलाचे क्षण येतील. सावध रहा. विरुद्धलिंगी व्यक्तीकडून मनस्ताप होईल. काळवेळ पाहून बोला व निर्णय घेण्याची घाई करू नका. सप्टेंबरमध्ये तूळ राशीत गुरू ग्रह प्रवेश करत आहे. तुमच्या कामाचे फळ उशिराने मिळेल.

नोकरी-व्यवसाय:

शेतकरी या वर्षात संभ्रमात पडतील. जुन्या अनुभवांच्या जोरावर काही निर्णय घ्यावे लागतील. ऑक्टोबर, नोव्हें. व जुलैमध्ये खरेदी-विक्रीच्या व्यवहारात नुकसान भरून काढता येईल. धंद्यात भागिदारी असल्यास मतभेद व तणाव होईल. व्यवहारात पारदर्शकता ठेवल्यास समस्या कमी होतात. जास्त पैसा मिळवायाच्या नादाने भलत्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास फसगत होईल. कौटुंबिक वाटाघाटीत तणाव होईल. फेबु., मार्च व जूनमध्ये कोणताही व्यवहार करताना सावध रहा. अनाठाई खर्च होईल. नोकरीत तणाव सहन करावा लागेल. नोव्हें., जाने. व एप्रिलमध्ये रागावर नियंत्रण ठेवा. तडकाफडकी निर्णय घेऊन नोकरी सोडू नका. हातघाईवर येऊ नका. कोर्टकचेरी मागे लागू शकते. वरिष्ठांची मर्जी राखणे भाग पडेल. आहे त्यात समाधान मानावे लागेल. कष्टानंतर सुख असते तेव्हा उदास होऊ नका.

विद्यार्थी व तरुणवर्गासाठी:

वाकडय़ा मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न विद्यार्थीवर्गाने करू नये. अडचणीत याल. मित्रांच्या संगतीचा परिणाम जीवनावर होतो. त्यामुळे योग्य मित्र निवडा. वडीलधाऱयांचा सल्ला माना. ऑक्टो., नोव्हें., डिसें., मार्चमध्ये येणाऱया परीक्षेत यश मिळेल. या वर्षात जास्त अभ्यास करा. फक्त आयएमपी प्रश्न न करता चौफेर अभ्यास केल्यावरच अपयश टाळता येईल. वाहनाशी खेळ करू नका. दिवाळीत फटाके वाजवताना भलते धाडस नको. जाने., जूनमध्ये प्रेमात फसगत होईल. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात चमकण्यासाठी सातत्याने मेहनत करावी लागेल. प्रगतीची संधी शोधावी लागेल. जिद्द ठेवा. ध्येय सोडू नका.

महिलावर्ग:

प्रेमळ व दुसऱ्याला मदत करण्याची तुमची वृत्ती आहे. हे सर्व करताना चाणाक्षपणा ठेवा. मौल्यवान वस्तू सांभाळा. नोकरी, व्यवसाय अथवा इतर तुमच्या क्षेत्रात अडथळय़ांवर मात करण्याची शक्ती ठेवा. दुसऱयावर जास्त अवलंबून न राहता स्वतःच लक्ष द्या. नोव्हें., जाने. पोटाचा त्रास होऊ शकतो. किरकोळ दुखापत किंवा ऑपरेशनची वेळ येऊ शकते. शेजाऱयांबरोबर एप्रिलमध्ये मतभेद होण्याचा संभव आहे. आप्तेष्ट, मित्र यांच्या मदतीला जावे लागेल. एखादे दडपण मनावर राहील, परंतु तुमचे कार्य चालू राहील हा विश्वास ठेवा.

आपली प्रतिक्रिया द्या