देशाच्या लष्करप्रमुखपदी मराठी माणूस, लेफ्ट. जनरल मनोज नरवणे पुढील लष्करप्रमुख

1783

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे देशाचे नवीन लष्करप्रमुख असणार आहेत. नरवणे हे स्वतंत्र हिंदुस्थानचे 28 वे लष्करप्रमुख असतील. सध्या लष्करप्रमुखपदी असलेल्या जनरल बिपीन रावत यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे नव्या वर्षामध्ये लेफ्ट. जनरल मनोज नरवणे लष्करप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारतील.

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी याच वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये उपलष्करप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली होती. उपलष्करप्रमुख झाल्यामुळे आता ते लष्करातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी ठरले होते. त्यांनी उपलष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत असलेल्या लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या जागी ते येऊ शकतात हा अंदाज वर्तवला जात होता. आता हा अंदाज खरा ठरला आहे.

लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे मराठमोळे असून ते मूळचे पुण्याचे आहेत. नरवणे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत झाले. त्यांनी पुण्यातील एनडीए आणि डेहराडून येथील सैन्य अकादमी येथे लष्करी शिक्षण घेतले. 1980 मध्ये ते लष्करात शीख लाइट इन्फंट्रीच्या सातव्या बटालियनमध्ये दाखल झाले. 37 वर्षांची त्यांची लष्करी सेवा आहे. जम्मू-कश्मीरात राष्ट्रीय रायफल्स बटालियन आणि ईशान्य हिंदुस्थानात इफ्रंट्री ब्रिगेडचे त्यांनी नेतृत्व केले आहे.

श्रीलंकेत हिंदुस्थानी लष्कराच्या शांतता सुरक्षा दलामध्येही त्यांनी काम केले आहे. लेफ्टनंट जनरल नरवणे यांना उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘परमविशिष्ट सेवा मेडल’, ‘अतिविशिष्ट सेवा मेडल’, ‘सेना मेडल’ आणि ‘विशिष्ट सेवा मेडल’ने सन्मानित करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या