
सामना ऑनलाईन । पठाणकोट
जम्मू-कश्मीरमधील कठुआ येथे अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या 6 आरोपींपैकी न्यायालयाने तिघांना जन्मठेप सुनावली आहे. तर तीन आरोपींना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सांझीरामसह पोलीस अधिकारी दीपक खजुरीया आणि सुरेंद्र वर्मा, पोलीस हेडकॉन्स्टेबल तिलक राज व इतर अशा 6 आरोपींना पंजाबच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. तर एकाची मुक्तता करण्यात आली होती.
देशभर गाजलेल्या जम्मूमधील कठुआ येथील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाची सुनावणी पंजाबमधील पठाणकोट येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी जम्मू-कश्मीरबाहेर करावी अशी मागणी या घटनेतील मृत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी केली होती. तसेच आरोपींना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली होती.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी या प्रकरणात दोषींना फाशीच्या शिक्षेची अपेक्षा होती, असं म्हटलं आहे. जम्मू कश्मीर राज्य सरकारने या निर्णयाविरोधात वरिष्ठ न्यायालयात जावं, असंही त्या म्हणाल्या आहेत.
National Commission for Women Chairperson, Rekha Sharma: Was expecting capital punishment for Kathua rape and murder criminals. Jammu and Kashmir government must go for appeal in higher court. (File pic) pic.twitter.com/xXIBgL4gvd
— ANI (@ANI) June 10, 2019