विषारी इंजेक्शन टोचून 85 रुग्णांचा जीव घेतला, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

सामना ऑनालाईन । ओल्डेननबर्ग

जर्मनीत एका पुरुष परिचारकाला 85 रुग्णांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नील्स होगले (42) असे या विक्षिप्त परिचारकाचे नाव असून त्याने विषारी इंजेक्शन टोचून जवळपास 200 पेक्षा जास्त रुग्णांना ठार केल्याचा पोलिसांना संशय आहे. दुसऱ्या महायुध्दानंतर नेल्स हा जर्मनीतील सर्वात क्रूर सीरियल किलर ठरला आहे.

नील्स रुग्णालयात परिचारकाचे काम करत असताना त्याला एक विचित्र सवय लागली होती. तो रुग्णांना गुपचूपपणे विषाचे इंजेक्शन टोचायचा. आपण कोणतं विष दिलं आहे आणि त्यातून रुग्णाला कसं वाचवू शकतो याचा थोडाफार अंदाज असल्याने नील्स या रुग्णांवर उपचाराचा प्रयत्न करायचा. इतरांच्या नजरेत आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी त्याचा हा सगळा खटाटोप सुरू होता. मात्र त्याच्या या जीवघेण्या प्रयत्नांमध्ये 200 रुग्णांचा जीव गेला असावा असा पोलिसांना संशय आहे. यातील 85 जणांचा मृत्यू हा नील्सच्या विषारी इंजेक्शनमुळेच झाल्याचे पोलिसांनी साक्षीपुराव्यानिशी सिद्ध केले आहे.

1999 ते 2005 या काळात नील्सने या हत्या केल्या आहेत. एका रुग्णाला इंजेक्शन देताना रंगेहात पकडल्यावर त्याच्या क्रूर कारनाम्यांचा भांडाफोड झाला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांना पुरलेले 130 मृतदेह पुन्हा बाहेर काढले होते. जर्मनीतील न्यायालयामध्ये नील्सविरोधात खटला चालण्यात आला. न्यायमूर्ती सबॅस्टियन बुहरमान यांनी नील्सचे क्रौर्य मानवी आकलनाच्या पलिकडे असल्याचे सांगून त्याला जन्मठेप देत असल्याचा आदेश दिला. यापूर्वी नील्सला 6 रुग्णांच्या हत्येप्रकरणी जन्मठेप सुनावण्यात आली असून तो गेली 10 वर्ष तुरुंगात आहे. तुरूंगात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या