हे जीवन सुंदर आहे…

168

आसावरी जोशी,[email protected]

अक्षयकुमार… एक परिपक्व, संवेदनशील अभिनेता… तो करीत असलेल्या बऱयाच गोष्टी त्याचे इतरांहून वेगळेपण दाखविणाऱया… त्याचे मराठी प्रेम, अभिनयातील परिपक्वता, फिटनेसविषयी अत्यंत सजगता आणि बरेच काही… थोडक्यात, जगण्यावर भरभरून प्रेम करणारा…

आजचा बॉलीवूड स्टार… चाहत्यांनी दिलेली अनेक बिरुदे मिरवून तो या मायानगरीत सर्वोच्च पदावर मस्तपैकी स्थिरावलाय. एका चित्रपटामागे त्याची कमाई २५ कोटी. आज तो त्याच्या कारकीर्दीत आणि वयाच्या अशा टप्प्यावर आहे की, पहिले किंवा दुसरे स्थान हे त्याच्या दृष्टीने फक्त आकडे आहेत. किंबहुना ही स्थानाची चढाओढ त्याच्या खिजगणतीतही नाही. तो झकासपैकी त्याचे काम करतोय. वर्षाला 3-4 चित्रपट करतोय. त्याचा अत्यंत आवडीचा स्वत:चा फिटनेस जपत… आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देत… पुन्हा त्याच्या जाणिवांनी टिपलेल्या नेणिवेतून समाजासाठीही काहीतरी करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. थोडक्यात, मस्त चाललंय आमचं… या थाटात तो मोठय़ा मजेत पुढे निघालाय…

अक्षय कुमार… खऱया अर्थाने संवेदना जपणारा एक चांगला माणूस… तसे पाहिले तर सुरुवातीला एखादा सर्वसामान्य चित्रपट अभिनेता असावा तसाच तो. बऱयापैकी व्यक्तिमत्त्व, थोडाफार नाच, अभिनय… भरपूर हाणामारी… चविष्ट प्रेमप्रसंग… थोडेफार नाव झाल्यानंतर अनेक चित्रपट अभिनेत्रींबरोबर नाव जोडले जाणे अशा सर्व आम गोष्टी जो एक चित्रपट अभिनेता करतो त्या अक्षयकुमारनेही केल्या; पण या छानछोकीच्या गोष्टींपलीकडेही जाऊन त्याचे विचार करीत असलेले संवेदनक्षम हळूहळू त्याच्या अभिनयातून जाणवू लागले. माझ्या मते याची सुरुवात झाली यश चोप्रांच्या ‘यह दिल्लगी’ या चित्रपटापासून. त्याच्या मारधाडीपासून बरीच वेगळी असलेली भूमिका… नायकाचा समजूतदारपणा, तरल, सजग मानसिकता दाखविणारी भूमिका… अक्षयने ही भूमिका समरसून केली आणि त्याच्यात एक समजूतदार अभिनेता आहे हे त्याने दाखवून दिले. हा एक लक्षणीय बदल बरोबर घेऊन अक्षयची वाटचाल पुढे सुरू झाली आणि त्याच्या कामाने रंग बदलण्यास सुरुवात केली. ‘भूलभुलय्या’, ‘हे बेबी’सारख्या चित्रपटांतून अक्षयचे सकारात्मकरित्या बदलणे जाणवत राहिले. आज त्याचा प्रत्येक चित्रपट एक वेगळा विषय घेऊन येत असतो.. मग तो ‘एअरलिफ्ट’ असो, ‘बेबी’ किंवा मग अगदी अलीकडचा ‘रुस्तम’… त्याचे परिपक्व होणे तो अधोरेखित करीत गेला आणि त्यात भर पडली त्याने वारंवार शेतकऱयांना केलेल्या मदतीची… ही अशा प्रकारची मदत अनेक हिंदी, मराठी कलावंत सातत्याने करीत असतात. त्या पैशाच्या मदतीचे फारसे मोठे माझ्या मते तरी नाही; कारण मुबलक पैसा त्यांनी कमावलेला असतो… कमवत असतात… त्यामुळे आर्थिक मदतीचे समाजकार्य हा त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग असतो असे म्हटले तरी त्यात वावगे ठरू नये.

आज पुन्हा अक्षयकुमारचा ‘जॉली एलएलबी-२’ हा नवीन चित्रपट येतोय. येथे त्याने पुन्हा एकदा स्वत:चे वेगळेपण दाखवून दिले. मराठी प्रेक्षकांत चित्रपटाच्या प्रसारासाठी त्याने केलेली मराठी मालिकेची निवड… तो जिथे राहतो त्या मातीशी इमान राखण्याचा त्याचा प्रामाणिकपणा, परिपक्वपणा मला सर्वाधिक भावतो. आज मुंबईतच संपूर्ण आयुष्य गेलेले… मुंबई हीच कर्मभूमी असलेले अनेक प्रथितयश अमराठी अभिनेते, अभिनेत्री आहेत; पण त्यापैकी कितीजण खऱया अर्थाने मराठी मातीशी बांधिलकी जपतात? अक्षय संधी मिळेल तिथे व्यवस्थित मराठीतून बोलत असतो. मुलाखत देत असतो. पुन्हा अभिमानाने ही मराठीशी असलेली बांधिलकी तो मिरवतो. याबाबत अक्षय सांगतो, आम्ही मूळचे दिल्लीचे पण जेव्हा मुंबईत स्थिरावयाचे ठरले तेव्हा आग्रहाने मराठी शिकून घेतली. त्याचे मराठी प्रेम त्याच्याशी संवाद साधतानाही जाणवत राहते. एखाद्या रिऑलिटी शोमध्ये चित्रपटाच्या प्रसारासाठी येणे ही आजच्या काळातील एक खरेच आम बात; पण आवर्जून तिथल्या प्रादेशिक भाषेतील मालिकेत येणे ही गोष्ट खरेच त्याचा वेगळेपणा दर्शविणारी.

याखेरीज त्याचे फिटनेसविषयी जागरूक असणे हे आजच्या काळात खरेच कौतुकास्पद…

अक्षयमध्ये मला नेहमी तुमच्या-माझ्यात दिसणारा साधा सोपा आयुष्य जगणारा एक सामान्यातील असामान्य माणूस दिसतो… आपले काम प्रामाणिकपणे करीत राहणे, शिस्तबद्ध आयुष्य जगणे, जगण्यावर भरभरून प्रेम करणे, आपल्या माणसांवर भरभरून प्रेम करणे…

अजून काय काय लागते सुखी, आनंदी होण्यासाठी…!

अक्षयची स्वत:ची अशी काही तत्त्वे आहेत… आणि तो ती अत्यंत प्रामाणिकपणे पाळत असतो. त्याची ही तत्त्वे मला फार सोपी पण तितकीच आपण सामान्यांनीही अनुसरण्याजोगी वाटली…

तो धूम्रपान अथवा मद्यपान करीत नाही.

अत्यंत शिस्तबद्ध जीवनशैली हे त्याचे वैशिष्टय़ आहे.

व्यायाम आणि घरचे अन्न हा त्याच्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे.

ज्या प्रदेशात तो राहतो तिथली भाषा, जीवनशैली आत्मसात करण्याबाबत तो आग्रही असतो.

निरोगी राहण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. नैसर्गिक जगण्यावर जास्तीतजास्त भर.

कृत्रिम पावडर, सप्लिमेंट्स यापासून तो दूर राहतो.

त्याचे वेगळेपण म्हणजे, तो कधीही व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करीत नाही.

पोहणे, मार्शल आर्ट, धावणे हे त्याच्या व्यायामाचे मूलमंत्र.

व्यायामाला वेळ नाही मिळाला तर तो जिथे राहतो त्या इमारतीचे जिने चढतो-उतरतो.

आपल्या कुटुंबावर अतिशय प्रेम करतो.

आई, बहीण आणि मुले या त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. तिथे तो कोणतीही तडजोड करीत नाही.

त्याच्या आवडत्या काही गोष्टी…

आवडत पदार्थ : थाई ग्रीन चिकन करी

आवडता रंग : निळा

आवडता खेळ : मार्शल आर्ट, क्रिकेट, नौकानयन

आवडती ठिकाणे : गोवा, कॅनडा

आवडता अभिनेता : रणवीर सिंग, कमल हसन

आवडती अभिनेत्री : श्रीदेवी

आयुष्य म्हणजे : हे जीवन सुंदर आहे!

 

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या