हिवाळ्यात चेहरा धुतल्यानंतर त्वचा कोरडी होते का? ‘हे’ नैसर्गिक उपाय करून पाहा

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. या दिवसांत चेहरा धुतल्यानंतर त्वचा कोरडी पडते. खेचल्यासारखी वाटते. अशा वेळी त्वचेत नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यासाठी तेलाची आवश्यकता असते. त्वचेच्या स्वच्छतेसाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचा कोरडी होण्यापासून तिचे रक्षण होऊ शकते. शिवाय त्वचेतील आर्द्रता टिकून राहते.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोरफडीच्या गराचा वापर करू शकता. यासाठी कोरफडीचा ताजा गर काढून घ्या. थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून कोरफडीचा गर चेहऱ्याला व्यवस्थित लावा. थोडा वेळ मसाज करा आणि 2 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. कोरफड गरामुळे चेहऱ्याची त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत होते आणि आर्द्रता टिकून राहायला मदत होते.

हिवाळ्यात चेहऱ्याची स्वच्छता करण्यासाठी दही अत्यंत फायदेशीर ठरते. याकरिता एका बाऊलमध्ये थोडेसे दही घ्या. दही चेहरा आणि मानेला लावा. 1-2मिनिटे मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा, मान स्वच्छ धुवा. चेहरा उजळ होईल शिवाय आर्द्रता टिकून त्वचा मऊ, लुसलुशीत व्हायला मदत होईल.

कच्च्या दुधाचा वापर चेहऱ्याकरिता केल्यास अनेक फायदे होतात. कच्च्या दुधाने चेहरा स्वच्छ केल्यास त्वचेतील आर्द्रता टिकून राहायला मदत होते. चेहऱ्याची त्वचा कोरडी होण्यापासून त्याचे रक्षण होते. याकरिता दोन चमचे कच्चे दूध कापसाच्या बोळ्याच्या मदतीने चेहऱ्याला लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

एक बटाटा मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर कॉटनच्या कपड्यात गाळून घेऊन त्याचा रस काढा. हा बटाट्याचा रस चेहऱ्याला लावा. 5 मिनिटांनंतर थंडगार पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील डाग, पुटकुळ्या निघून जातील शिवाय चेहरा स्वच्छ होईल.