हिवाळ्यात आहारात करा ‘या’ फळांचा समावेश, त्वचा होईल चमकदार आणि मुलायम

हिवाळ्यात हवेतील गारवा आणि उबदारपणाचा आनंद घेता येतो. या दिवसांत आहार आणि त्वचेची काळजी घेणेही महत्त्वाचे असते, कारण त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. वातावरणातील गारव्याचा त्वचेवर परिणाम होऊन त्वचा कोरडी पडू शकते, तर काही वेळा त्वचेवर डाग पडणे, ओठ फुटणे, काळे होणे, खाज सुटणे, त्वचेची जळजळ होणे, असे त्वचेच्या अनेक समस्यांना हिवाळ्यात तोंड द्यावे लागते. त्वचेची नियमित काळजी घेण्यासोबत आहाराकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेचे सौंदर्य टिकून राहायला मदत होऊ शकते. जाणून घेऊया या दिवसांत आहारात कोणत्या फळांचा समावेश केल्यास त्वचा सुंदर, चमकदार आणि मुलायम व्हायला मदत होते.

योग्य जीवनशैली आणि आहाराविहाराची योग्य पथ्ये पाळली तर कोरडेपणा, सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांपासून त्वचेचे रक्षण होऊ शकते. याशिवाय त्वचेवरील सुरकुत्या आणि वाढत्या वयाची लक्षणेही कमी होऊ शकतात.

संत्र
शरीराला जीवनसत्त्व सी मिळावे यासाठी दररोज एक संत्र खाणे आवश्यक आहे. कोरड्या त्वचेसाठी वरदान ठरणारा फेस पॅक बनवण्यासाठी संत्र्याचा रस, लिंबाचा रस, हळद आणि मध मिक्स करू शकता. संत्र खाल्ल्याने शारीरिक आरोग्यासोबत त्वेचेचे सौंदर्यसुद्धा वाढायला मदत होते.

केळं
केळं हे उत्तम प्री-वर्कआऊट स्नॅक आहे. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून दूर राहायला मदत होते. केळ्यामध्ये जीवनसत्त्व के, क, ई आणि ए जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असतात. केळी हे नैसर्गिक मॉइश्चरायझरदेखील आहे. तुम्हाला तुमची त्वचा त्वरीत मॉइश्चरायझ्ड, मऊ आणि लवचिक बनवायची असेल, तर मॅश केलेले केळे चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहरा स्वच्छ, तजेलदार आणि उजळ व्हायला मदत होईल.

स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीमध्ये जीवनसत्त्व सी आणि सॅलिसिलिक अॅसिड असते. स्ट्रॉबेरीमुळे त्वचा उजळ आणि चमकदार होते. त्वचेवरील मुरुमं निघून जाण्यास फायदा होतो. यासाठी स्ट्रॉबेरी खाल्ल्याने किंवा मॅश करून त्वचेवर लावल्यानेही फायदा होऊ शकतो. त्वचेच्या आरोग्यासाठी स्ट्रॉबेरीचा आहारात समावेश हासुद्धा एक उत्तम पर्याय आहे.

पपई
पपईमध्ये जीवनसत्त्वे, खनिज आणि एंझाइम्स असतात. ज्यामुळे त्वचेचे अनेक आजार दूर होण्यास मदत होते. बद्धकोष्ठेतपासून सुटका होण्यासाठी पपई खावी. तुमची त्वचा तात्काळ मुलायम व्हावी, असे जर तुम्हाला वाटत असेल तर पपई मॅश करून तिचा मास्क कोरड्या त्वचेवर लावा. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार दिसेल.

डाळिंब
डाळिंबात इलॅजिक अॅसिड असते. हे अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि पिगमेंटेशनशीदेखील लढते. रोज एक डाळिंब खा. डाळिंबाचा वापर चेहऱ्यावर मास्क म्हणून करता येतो. यासाठी डाळिंबाच्या रसात लिंबाचा रस, मध आणि बेसन मिसळून मास्क तयार करा. यामुळे रंग उजळेल आणि त्वचेचा कोरडेपणा कमी व्हायला मदत होईल.