प्रौढांनी कोणते बेबी प्रोडक्ट वापरावेत, वापर कसा करायचा याकरिता वाचा

मऊ आणि लुसलुशीत त्वचेकरिता महागड्या सौंदर्य उत्पादनांचा वापर केला जातो, मात्र प्रत्येकालाच ही महागडी उत्पादने परवडतात किंवा त्वचेसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे नाही. काही जणांना यामुळे त्रासही होऊ शकतो. प्रत्येक वयोमानानुसार वापरायची सौंदर्य प्रसाधने बदलतात. वाढत्या वयानुसार, त्वचेतही बदल होतो, मात्र काही उत्पादने बाजारात अशीही असतात, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंतच काय पण वयोवृद्धांनाही उपयोगी पडू शकतात. ही उत्पादने वापरल्याने त्वचा आणि इतर समस्यांपासूनही आराम मिळू शकतो.

बेबी वाईप्स
द हेल्‍दी डॉट कॉमच्या मते, बाळांची कोमल त्वचा साफ करण्यासाठी बेबी वाईप्सचा वापर केला जातो. बेबी वाइप्समध्ये रासायनिक घटकांचे प्रमाण कमी असते. या वाईप्सचा वापर महिला मेकअप काढण्यासाठीही करू शकतात. याशिवाय बूट स्वच्छ करण्यासाठी बेबी वाइप्सचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे बुटांना छान चमक येईल.

सनस्क्रिन
लहान मुलांसाठी वापरण्यात येणारे सनस्क्रीन लोशन प्रौढांसाठीही उपयुक्त ठरू शकते. बाळाच्या सनस्क्रीनमध्ये रासायनिक घटक कमी प्रमाणात असतात. यामुळे मोठ्या व्यक्तिंच्या त्वचेला इजा होत नाही. शिवाय दररोज सनस्क्रीन वापरल्याने त्वचा टॅन होण्यापासून तिचे रक्षण होते.

बेबी पावडर
उन्हाळ्यात बेबी पावडर जास्त फायदेशीर ठरते. यामुळे घाम आणि उष्णतेपासून रक्षण होते. अनेक वेळा मांड्यांना इजा होते, त्याजागी बेबी पावडर लावल्याने मांड्या कोरड्या राहतात. मुख्य म्हणजे कोणतेही दुष्परिणामही होत नाहीत.

निप्पल बाम
स्तनपान करणाऱ्या मातांना निप्पल बाम लावण्याचा सल्ला दिला जातो. हे निप्पल बाम केवळ स्तनाग्रच नव्हे तर कोरडे, फाटलेले ओठ आणि खडबडीत टाच यासह हाताचे कोपर, पायाचे गुडघेदेखील मऊ ठेवण्यास मदत करतात.