केस गळून टक्कल पडू लागलंय का, पुरुषांनी तात्काळ सुरू करावेत ‘हे’ उपचार

महिलांप्रमाणेच पुरुषांचेही केस गळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जीवनशैलीतील ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या पद्धती, अपुरी झोप, नैराश्य, प्रदूषण, अति धूम्रपान, अनुवांशिक इत्यादी कारणांमुळे पुरुषांच्या या समस्येत वाढ झाल्याचे दिसून येते. 35-40 वर्षे वयाच्या तरुणांच्या डोक्यावरही हल्ली पूर्ण टक्कल पडलेले दिसते, मात्र सुरुवातीपासूनच याकडे लक्ष दिले तर केसगळतीवर त्वरित उपचार करता येऊ शकतात. कमी वयात टक्कल पडण्याच्या समस्येवर त्रस्त असलेल्यांनी जीवनशैलीत आवश्यकतेनुसार कोणते बदल करणे गरजेचे आहे, जाणून घेऊया.

– अंड, पालक, मांसाहारी पदार्थ, छोले, भोपळ्याच्या बिया, सोयाबिन इत्यादी पदार्थांनी युक्त संतुलित आहार केसांची वाढ आणि मुळे मजबूत होण्यासाठी आवश्यक आहे. हेअर फॉलिकल्स प्रथिने आणि लोहापासून बनलेले असतात, जे केसांच्या वाढीकरिता ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करतात. जेव्हा शरीराला पुरेशी प्रथिने मिळत नाहीत, तेव्हा उर्वरित प्रथिने शरीराच्या इतर कार्यांसाठी वापरली जातात आणि त्यामुळे केसांना प्रथिने मिळत नाहीत. त्यामुळे प्रथिनयुक्त समतोल आहार घ्यावा.

– नैसर्गिकरित्या केसांची काळजी घ्यावी. केसांकरिता ड्रायर, वेगवेगळ्या प्रकारच्या मशिन आणि रासायनिक पदार्थांचा वापर करणे टाळावे. यामुळे केस गळण्याची समस्या वाढू शकते. केसांची मुळे मजबूत होण्याकरिता नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा. यामुळे केसांत कोंडा होणे, केस गळणे, खाज येणे यासारखे त्रासही दूर व्हायला मदत होईल.

– टक्कलावर उपचार म्हणून मेथी उपयुक्त आहे. मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्यांनंतर दही आणि मेथी दाण्यांची पेस्ट करा. केसांच्या मुळांशी लावा. एक तास ही पेस्ट केसांत राहू द्या. यामुळे केसांतील कोंडा, डोक्याची त्वचा कोरडी पडणे, केस गळणे यासारख्या समस्या दूर होतील. मेथीत निकोटिनिक अॅसिड आणि प्रथिने असतात. त्यामुळे केसांना पोषण मिळून केसांची वाढ होते.

– केळ्यात लिंबूचा रस मिक्स करून ते एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्या. ती डोक्याला लावा. केस गळण्याची समस्या दूर होईल. या उपायामुळे टक्कल पडलेल्या ठिकाणी पुन्हा केस येतील.

– एक मोठा कांदा घेऊन तो दोन भागात कापून घ्या. ज्या भागात केस गळाले आहेत. त्या ठिकाणी कापलेला कांदा पाच मिनिटांपर्यंत रगडा. काही दिवस हा प्रयोग केल्यास केस गळणे बंद होईल आणि पुन्हा केस येण्यास सुरुवात होईल.

– कोथिंबीरचे पेस्ट बनवून डोक्याच्या त्या भागाला लावा ज्या ठिकाणी टक्कल पडले आहे. असे लागोपाठ एक महिने केल्यास पुन्हा केस येण्यास सुरूवात होईल.