घसादुखी, खवखव यापासून आराम मिळवायचाय, ‘हे’ करा रामबाण उपाय

हिवाळ्यात घसा खवखवणे, सर्दी-खोकला, असे अनेक प्रकारचे त्रास होत असतात. वारंवार घसा दुखत असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. हल्ली वाढत्या प्रदूषणामुळे घसादुखी, कोरडा खोकला असे त्रास बऱ्याच जाणांना होतात. यासाठी तात्पुरते प्राथमिक उपचार घरच्या घरी करू शकतात. या उपचारांनीही बरे वाटले नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. पाहूया काही घरगुती उपाय ज्या उपायांनी हिवाळ्यात घसादुखीच्या समस्येपासून आराम मिळवता येईल.

लसूण
थंडीत लसणाचा वापर अवश्य करावा. यामध्ये एलिसिन नावाचे तत्त्व असते. ज्यामध्ये अँण्टी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. लसणाच्या वापरामुळे घशातील बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यामुळे सर्दीमुळे घसा दुखत असल्यास घशाला आराम मिळण्याठी लसणाचा वापर करावा.

आर्युर्वेदिक चहा
थंडीच्या मोसमात गरमागरम चहा पिण्याचा आनंद वेगळाच असतो, पण जर घसा दुखत असेल तर गरम गरम चहा प्यायल्यानेही आराम मिळू शकतो. याकरिता चहा तयार करताना त्यामध्ये काळीमिरी, आले, लवंग हे पदार्थ घालावेत. यामुळे घशातील वेदना, घसादुखीस, खवखव दूर होतात. यासोबतच शरीराला उष्णताही मिळेल. चहामध्ये तुळशीची पाने टाकून पिणेदेखील खूप फायदेशीर आहे.

ज्येष्ठमध
घसा दुखत आणि खवखवत असेल तर ज्येष्ठमध हे एक उत्तम औषध आहे. यासाठी ज्येष्ठमधाचे तुकडे दातांनी चावावेत. हळहळू चावताना त्याचा रस गिळावा. यामुळे घसादुखी, कोरडा खोकला कमी होतो.

कोल्ड स्मुदी
वाचून आश्चर्य वाटेल, पण हिवाळ्यात कोल्ड स्मूदी प्यायल्याने घसादुखी, खवखव या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
स्मूदीमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. स्मूदीमध्ये ताजी फळे, दलिया, आले, चिमूटभर हळद, पाणी आणि दूध आणि बर्फाचे तुकडे वापरू शकता.

ओटमील
ओटमीलमध्ये अँटिऑक्सिडंट्स, झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. यासोबतच दलिया आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. यामध्ये तुम्ही मॅश केलेल्या केळीचाही समावेश करू शकता. ओटमीलमध्ये मध, दालचिनी पावडर आणि थोडे आले मिसळून ते खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

मध
आयुर्वेदात मधाचा उपयोग औषध म्हणून केला जातो. मधामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. चहा किंवा स्मूदीमध्ये मध वापरू शकता. घशातील वेदना कमी करण्यासाठी मध खूप फायदेशीर आहे.