अनेक आजारांना दूर ठेवतो स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ, जाणून घ्या फायदे

स्वयंपाकघरातील विविध प्रकारच्या पदार्थांना झणझणीत फोडणी देण्यासाठी लसणाचा वापर आवर्जून केला जातो. लसणाची चटणी तर बऱ्याच जणांना आवडते. अनेक पदार्थांमध्ये लसूण वापरला जातो. लसणामध्ये अँण्टीऑक्सीडेंट्स आणि अँण्टी इम्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. छोटाशा लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. शारीरिक दुखणे कमी करण्यासाठी लसूण गुणकारी आहे. विशेषत: सांधेदुखीने त्रस्त असलेल्यांसाठी लसूण खाणे फायदेशीर आहे. जाणून घेऊया निरोगी शरीरासाठी लसणाचे अनेक लाभदायक फायदे.

लसणामध्ये जीवनसत्त्व बी-6, जीवनसत्त्व सी आणि विविध प्रकारचे मिनरल्स असतात. यामुळे शरीर डिटॉक्स करणे किंवा शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी लसूण अतिशय परिणामकारक आहे. याशिवाय हल्ली प्रदूषणामुळे सतत सर्दी आणि खोकल्यासारखे आजार वाढले आहेत. यावर लसूण हा रामबाण उपाय आहे.

– आहारविहाराच्या चुकीच्या पद्धतीमुळे कोलेस्ट्रॉलची समस्या वाढू शकते. रिकाम्या पोटी लसणाच्या एक ते दोन पाकळ्या खाल्ल्यास रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढण्यासाठी मदत होते.

– उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास आहारात लसणाचा वापर करावा. रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळ्या सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते.

– फोडणीतला लसूण, लसूण चटणी अशा कोणत्याही स्वरुपात लसूण सेवन केल्यास पचनशक्ती सुधारते. ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे. त्यांनी आहारात लसणाचा आवर्जून समावेश करावा.