मासिक पाळीच्या दुखण्यात आरामदायी ‘हिटिंग पॅड्स’ घरी कसे तयार कराल, जाणून घ्या

मासिक पाळीच्या वेळी काही जणी पोट आणि कंबरदुखीच्या त्रासाने बेजार होतात. या काळातील दुखण्यामुळे काय करावे, काहीच सुचत नाही. यावेळी ताणलेल्या स्नायूंना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे उपाय केले जातात. या काळात ‘हिटिंग पॅड्स’ विशेष आरामदायी ठरू शकतात. बाजारात ‘वॉटर हिटिंग बॅग’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक जेल पॅड’, असे विविध प्रकारचे हिटिंग पॅड विकत मिळतात. प्रत्येक वेळी असे हिटिंग पॅड उपलब्ध होतीलच असे नाही. यावेळी घरच्या घरीही गरम पॅड बनवून त्याच्या शेक घेऊन वेदना कमी होऊ शकतात. डोकेदुखी, छातीत दुखणे, सांधेदुखी यासारख्या त्रासांवरही हे हिटिंग पॅड फायदेशीर ठरू शकतात. घरच्या घरी सहजरित्या ते कसे बनवायचे याविषयी जाणून घेऊया.

टॉवेल हीटिंग पॅड
टॉवेल हीटिंग पॅड बनवणे खूप सोपे आहे. हिटिंग पॅडचा वापर कोणत्याही प्रकारच्या स्नायूच्या दुखण्यामध्ये आरामदायक ठरतो. जेव्हा गरम पाण्याच्या पिशव्या किंवा इलेक्ट्रॉनिक गरम पिशव्या उपलब्ध नसतात तेव्हा अशा प्रकारचे गरम पॅड सहजपणे घरी बनवता येतात. टॉवेल हिटिंग पॅड घरी बनवण्याकरिता दोन टॉवेल, एक झिपलॉक बॅग आणि मायक्रोवेव्ह या साहित्याची आवश्यकता आहे.

टोवेल ‘हिटिंग पॅड’ बनवण्याची कृती
याकरिता सर्वप्रथम, दोन्ही टॉवेल पाण्याने ओले करा आणि व्यवस्थित पिळून घ्या. त्यानंतर झिपलॉक बॅगमध्ये एक टॉवेल ठेवा आणि बॅगची झिप उघडी ठेवा. ही बॅग मायक्रोवेव्हमध्ये 2 मिनिटे गरम करण्यासाठी ठेवा. मायक्रोवेव्हमधून बॅग बाहेर काढा आणि झिपलॉक बॅग सील करा. दुसऱ्या ओल्या टॉवेलने सर्व बाजूंनी पिशवी झाकून ठेवा आणि वेदनादायक भागावर लावा. ही पिशवी 20 मिनिटे उबदार राहू शकते.

मोज्यांचे हीटिंग पॅड
कधी कधी मोज्यांची जोडी खराब होते, काही वेळा एक फाटतो, एक हरवतो, असेही होते. अशा वेळी घरात असलेला एकही वापरता येऊ शकतो. सॉक्सचे हिटिंग पॅड तयार करण्यासाठी मोठ्या आकाराचे स्टॉकिंग, तांदूळ आणि मायक्रोवेव्हची आवश्यकता आहे.

कसे तयार कराल?
अशा प्रकारचे हिटिंग पॅड तयार करण्यासाठी, मोज्यामध्ये तांदूळ भरा. मोज्याच्या वरच्या बाजुला पुरेशी जागा सोडा. जेणेकरून ते वरून बंद करता येईल. त्यानंतर रबर बँड किंवा धाग्याने मोजे बंद करा आणि मायक्रोवेव्हमध्ये 3 मिनिटे ठेवा. 3 मिनिटांनंतर, मायक्रोवेव्हमधून मोजे काढून टाका आणि वेदनादायक भागाला शेक द्या.