
आजकाल बहुतेक लोकं केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. काही जणांचे केस इतके गळतात की, त्यांना टक्कल पडले. अनेक वेळा केसांची योग्य काळजी न घेतल्याने केस जास्त गळतात, तर काही लोकांमध्ये पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळेही केस गळतात. केसगळती कमी करण्यासाठी आणि टक्कल पडलेल्या डोक्यावर पुन्हा केस येण्यासाठी लोक अनेक घरगुती उपाय करतात.
केसांची निगा राखण्यासाठी विविध प्रकारची महागडी उत्पादने वापरली जातात. एवढे करूनही फायदा होत नाही. अनेक वेळा केसांना आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाहीत, त्यामुळे केस अधिक गळू लागतात. काही पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास केसांना मोठ्या प्रमाणात पोषण मिळते आणि केस गळणेही कमी होते. जाणून घ्या, यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणे, आवश्यक आहे.
गाजर
केस खूप गळत असतील, तर आहारात गाजराचा समावेश करा. गाजरात जीवनसत्त्व अ असते. यामुळे केसांच्या आरोग्यासाठी गाजर खाणे फायदेशीर ठरते. केसांच्या वाढीकरिता जीवनसत्त्व ए आवश्यक असते. यामुळे केसांची वाढ जोमाने होते. गाजरामुळे टाळूमधील सीबमची निर्मिती वाढते. यामुळे केस हायड्रेट आणि निरोगी होतात. गाजर डोक्यातील रक्ताभिसरण वाढवते आणि अवेळी केस पांढरे होण्यास प्रतिबंध होतो.
अंडी
अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. यामुळे शरीरात कोलेजनची निर्मिती होते. कोलेजनमध्ये वाढ झाल्याने केस मजबूत, दाट आणि लांब होतात. मुळापासून केस मजूबत व्हायला मदत होते. यासोबतच अंड्यांमध्ये बायोटिन देखील असते, जे केसांसाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे केसांची वाढ जलद होते. अंड्यामध्ये असलेले लोह रक्ताभिसरण वाढवून केस मजबूत, चमकदार बनवते.
बेरी
ब्लूबेरी, रास्पबेरी, स्ट्रॉबेरी, क्रॅनबेरी इत्यादी बेरीचे अनेक प्रकार आहेत. या सर्व बेरीमध्ये जीवनसत्त्व सी तसेच अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. कोलेजनच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. बेरीच्या सेवनाने केस मुळांपासून मजबूत होतात. व्हिटॅमिन सी असलेल्या बेरीचे सेवन केल्याने केस तसेच संपूर्ण आरोग्य चांगले राहते.
लिंबूवर्गीय फळे
लिंबू, संत्री, द्राक्षे यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्येही जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असते. त्यात कोलेजनदेखील असते, जे केसांना ताकद देते. जीवनसत्त्व सी कोलेजनचे उत्पादन वाढवते. टाळूमधील रक्ताभिसरण सुधारायलाही यामुळे मदत होते. हे फ्री रॅडिकल्समुळे होणार्या ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून केसांचे रक्षण करते. लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने केसांची वाढ जलद होते. केस गळत असतील तर नियमितपणे लिंबूवर्गीय फळे आणि जीवनसत्तव सी युक्त बेरीचे सेवन करा.
एवोकॅडो, दालचिनी
केस गळतीमुळे टक्कल पडत असेल, तर तुम्ही दररोज दालचिनी आणि व्हिटॅमिन ईने युक्त एवोकॅडोचे सेवन केले पाहिजे. या दोन्हीमुळे केसांची वाढ होते. केसगळती कमी होते. एवोकॅडोमध्ये पोटॅशियम, बी जीवनसत्त्वे आणि फॉलिक अॅसिडदेखील असतात जे केसांची वाढ सुधारतात आणि त्यांना दाट बनवतात.