आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारेल

आपल्या शरीरात रक्तवाहिन्या महत्त्वाचे कार्य करतात. शरीरातील प्रत्येक अवयव आणि उतींपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन वाहून नेण्याचे कार्य रक्तवाहिन्या करतात. जेव्हा रक्तवाहिन्यांचे कार्य नीट होत नाही, तेव्हा आजारांना सामोरे जावे लागते. याकरिता रक्तप्रवाहातील अडथळे दूर होण्याकरिता आणि रक्तवाहिन्या निरोगी राहण्याकरिता आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, जाणून घेऊया.

वय वाढू लागले की, रक्तवाहिन्या कमकुवत होऊ लागतात. त्यांच्या कार्यात अडथळे येऊ लागतात. अशा वेळी आहारात काही पदार्थांचा समावेश करून रक्तवाहिन्या मजबूत व्हायला मदत होऊ शकते.

हिरव्या पालेभाज्या
पालक, माठ, चवळी इत्यादी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. या भाज्यांमध्ये नायट्रेट जास्त प्रमाणात असते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्याकरिता आणि रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्याकरिता मदत होते. यामध्ये जीवनसत्त्व के चे प्रमाणही जास्त असते त्यामुळे रक्तवाहिन्यांचा कडकपणा टाळता येतो.

बेरी
बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. विशेषत: अँथोसायनिन नावाचे अँटीऑक्सिडेंट, जे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यासाठी कार्य करते, ते यामध्ये असते. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरीमध्ये अँथोसायनिनचे प्रमाण खूप जास्त असते.

एवोकाडो
एवोकाडो मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तवाहिन्यांचे सुरळीत सुरू राहते. शरीराला येणारी सूज कमी करण्यासाठी एवोकाडो खाल्ल्याने फायदा होतो. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाणही जास्त असते. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.

कडधान्ये
कडधान्यांमध्ये तपकिरी तांदूळ, सर्व प्रकारच्य डाळी इत्यादींमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. जीवनसत्त्व ब या धान्यांमध्ये आढळते. यामुळे रक्तवाहिन्यांचा कडकपणा कमी व्हायला प्रतिबंध होतो.

कांदा
कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अँण्टीऑक्सिडंट्स फ्लेवोनॉइड भरपूर प्रमाणात असतात. हे आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते. अँटिऑक्सिडंट्ससोबतच कांद्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मही आढळतात. ज्यामुळे रक्तवाहिन्यांना येणारी सूज कमी व्हायला मदत होते.

हळद
एखादी जखम भरून निघण्यासाठी हळदीचा वापर करतात. हळद शरीराच्या आतली आणि बाहेरची दोन्हीकडची जखम बरी होण्यासाठी मदत करते. हळदीच्या सेवनाने रक्तप्रवाह सुधारतो.

टोमॅटो
टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे अँण्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असते. टोमॅटोमधील अँण्टीऑक्सिडंट रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास आणि सूज कमी करण्यासाठी मदत करतात. यासोबतच टोमॅटोमध्ये जीवनसत्त्व सी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रक्तवाहिन्या कडक होण्यास प्रतिबंध होतो.