घटलेलं वजन वाढवायचंय, करा ‘हा’ सोपा व्यायामप्रकार

वजन कमी करण्यासाठी काही जणांना अतोनात प्रयत्न करावे लागतात, तर काहींचे वजन कोणतेही प्रयत्न न करता सहज कमी होते. तुम्ही जर घटलेले वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर दररोज सूर्यनमस्कार घालणे, हा सोपा उपाय आहे. नियमित सूर्यनमस्कार घातल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. शरीराचा प्रत्येक अवयव सक्रीय होण्यास मदत होते. संथ गतीने सूर्यनमस्कार घातल्यास शरीरातील शक्ती वाढते आणि रक्ताभिसरण चांगले होते. भूक वाढण्याकरितादेखील मदत होते. यामुळे वजन वाढण्यासाठी दररोज सूर्यनमस्कार घालण्याचा सराव करावा.

सुरुवातीला एका नमस्कारापासून सुरुवात करावी त्यानंतर दररोज एकेका सूर्यनमस्काराची त्यात वाढ करावी. याप्रमाणे नियमितपणे कमीतकमी 24 सूर्यनमस्कार घालावेत. यासाठी सर्वप्रथम चटईवर पद्मासनात बसावे. डोळे बंद करून सूर्याला प्रार्थना करावी. ‘ओम’चे उच्चारण करून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. श्वासावर लक्ष केंद्रित करावे. त्यानंतर व्यायामाला सुरुवात करा.

सूर्यनमस्कार करण्याची योग्य पद्धत

प्रणामासन
चटईवर उभे राहून कंबर आणि मान सरळ ठेवा. दोन्ही हातांनी नमस्काराची मुद्रा करा. आता डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या.

हस्त उत्तानासन
दीर्घ श्वास घेऊन आता आपले हात डोक्याच्या वर हलवा आणि त्यानंतर हळूवारपणे डोके आणि कंबर मागे टेकवा. ही मुद्रा काही वेळ धरून ठेवा.

पदहस्तासन
आता श्वास सोडताना पुढे वाकवा. हाताच्या बोटांनी पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

अश्वसंचनासन
त्यानंतर तुमचा एक पाय मागे घ्या आणि एका पायाचा गुडघा जमिनीवर ठेवताना दुसरा पाय मागे ताणून घ्या. आता आपले तळवे जमिनीवर ठेवा आणि आकाशाकडे पहा.

दंडासन
आता तुमचे दोन्ही हात आणि पाय सरळ करा आणि त्यांना एका ओळीत आणा. पुश-अप्स करण्याच्या स्थितीत या आणि थांबा.

अष्टांग नमस्कार
तळवे, छाती, गुडघे आणि पाय जमिनीवर आणा आणि थोडा वेळ या स्थितीत स्वतःला थांबवून ठेवा.

भुजंगासन
तळवे जमिनीवर ठेवा आणि आता पोट जमिनीच्या जवळ ठेवून मान मागे वाकवा.

अधोमुख शवासन
पाय जमिनीवर सरळ ठेवा आणि नितंब वर उचला. तुमचे खांदे सरळ ठेवा आणि चेहरा आतील बाजूस ठेवा.

अश्व शांतासन
आता दुसरा पाय मागे घ्या. गुडघा जमिनीच्या जवळ ठेवून पहिला पाय वाकवा. तळवे जमिनीवर ठेवून आकाशाकडे पहा.

पदहस्तासन
पुढे वाकून आपल्या हाताच्या बोटांना स्पर्श करा. आपले डोके गुडघ्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा.

हस्त उत्तानासन
प्रणामासनाच्या मुद्रेत उभे राहून हात वर करून सरळ करा. हात नमस्काराच्या मुद्रेत आणा आणि त्यांना मागे हलवा आणि मागे वाकवा.

प्रणामासन
हात जोडून वाकण्याची मुद्रा करा आणि सरळ उभे रहा.